पोलिस असल्याची बतावणी करून सहा लाखांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पंचवटी - आम्ही पोलिस असून, तुमच्या घरात राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात, असे समजल्यावरून कारवाई करण्यासाठी आलो आहोत. तडजोड करायची असेल, तर सहा लाख रुपये द्या, अशी धमकीवजा मागणी झाल्याने धास्तावलेल्या दूध व्यावसायिकाने पंचवटी पोलिस ठाणे गाठून महिलेसह अन्य तिघा संशयितांविरोधात तक्रार दिली. 

शिंदे मळा परिसरात संतोष खैरे (वय ३९) यांची दूध डेअरी आहे. ते पत्नी, दोन मुले व चार कामगारांसह राहतात. सोमवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डेअरीत कामगारांसह काम करीत असताना चारचाकी वाहनातून (एमएच २, सीव्ही ६८९४) महिला व तीन पुरुष असे चार जण आले. त्यातील महिलेने भाड्याने खोली मिळेल का? असे त्यांना विचारले. खैरे यांनी खोली नाही, असे सांगितले. नंतर संबंधित महिलेने मी पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा भुजबळ असून, हे माझे पोलिस ठाण्यातील सहकारी आहेत. तुमच्या खोलीत राहात असलेल्या मुली वेश्‍याव्यवसाय करतात. त्यामुळे आम्ही चौकशी करायला आलो आहोत. मात्र, तडजोड म्हणून सहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर ते दमदाटी करून निघून गेले. नंतर खात्री केली असता, ते पोलिस नसल्याची खात्री झाली. त्यानंतर संबंधित महिलेने पुन्हा काल (ता. १९) दूरध्वनी करून पैशाची मागणी केली. खैरे यांनी कोठे भेटू, असे विचारले असता नाशिकला आल्यावर कळवितो, असे सांगितले. याबाबत श्री. खैरे यांनी आज पंचवटी पोलिस ठाणे गाठत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पंचवटी पोलिस खंडणीखोर महिलेसह तिघांचा शोध घेत आहेत.