स्वातंत्र्य चळवळीसह विकासात पांडे कुटुंबीयांचे योगदान

Pandey family
Pandey family

नाशिक - पालिका ते महापालिकेच्या प्रवासात शहराच्या विकासात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कुटुंबीयांनी योगदान दिले. त्यात पालिका काळातील पांडे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त करताना स्वातंत्र्यसैनिकांना आर्थिक मदत करण्यापासून ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योजना अमलात आणून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले जात होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्यात पांडे कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला. 

१९३७ मध्ये दिवंगत रामचंद्र ऊर्फ भय्यासाहेब जगन्नाथ पांडे नाशिकचे पहिले नगरसेवक, त्यानंतर पहिले नगराध्यक्ष राहिले. या काळात शहराचा विकास साध्य करताना देश पारतंत्र्यातून मुक्त करण्याचेही ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. एकीकडे विकासाची कामे मार्गी लावताना ब्रिटिश राजवटीविरोधात कधी छुपी, तर कधी उघडपणे मदत करण्याचे कार्य त्यांनी केले. ब्रिटिशविरोधी चळवळीला आर्थिक मदतीची त्याकाळी मोठी चणचण भासायची. ही बाब हेरून भय्यासाहेबांनी आर्थिक मदत देण्याचे काम केले. त्यानंतर पांडे कुटुंबीयातील दिवंगत दुर्गाप्रसाद ऊर्फ बाळासाहेब पांडे यांनी राजकारणाचा वारसा सांभाळला. १९५७ ते १९६२ दरम्यान नगरसेवक व नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळले. स्थायी समितीचे ते अध्यक्षही राहिले. संघटना पातळीवर काँग्रेसचे ते दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. १९६२ ते १९६७ या काळात दिवंगत प्रभाकर रामचंद्र पांडे यांनी नगरसेवक व नगराध्यक्षपदाची कारकीर्द गाजविली. दिवंगत दुर्गाप्रसाद पांडे यांचा मुलगा दिवंगत श्रुतीप्रसाद पांडे यांनी सत्तेच्या राजकारणात फारसा रस न घेता विद्यार्थी चळवळीकडे लक्ष दिले. १९६० च्या दशकात विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी विद्यापीठाचे अध्यक्षपद सांभाळले. दिवंगत प्रभाकर यांचा मुलगा दिवंगत जगदीश प्रभाकर पांडे यांनी सत्तेच्या राजकारणात फारसा रस दाखविला नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष, गोदावरी सहकारी बॅंकेचे संचालक, पंचवटी सिटिझन फोरमचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. दिवंगत जगदीश यांच्या पत्नी कल्पना या पांडे कुटुंबीयांच्या राजकारणाचा वारसा सध्या चालवत आहे. काँग्रेसच्या निरीक्षक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे.

विकासात योगदान

भय्यासाहेब यांचे स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांना मोठ्या सवलती देण्यात आल्या. त्या सवलतींचा फायदा त्यांनी कधीही घेतला नाही. सत्तेच्या राजकारणात पांडे कुटुंबीयांनी विकासाला महत्त्व दिले. रामसेतूची उभारणी, भाजी बाजार, १९५६ च्या सिंहस्थात रामघाटाची उभारणी करताना दत्त मंदिराचे स्थलांतर, यशवंत मंडईची उभारणी तसेच जुने नाशिक भागातील रस्त्यांसाठी जागा देण्याचे कार्य पांडे कुटुंबीयांनी पार पाडले. दुतोंड्या मारुतीची मूर्ती उभारण्यासाठी पांडे कुटुंबीयांनी स्वखर्चातून राजस्थान येथील कारागिरांच्या माध्यमातून ही मूर्ती घडविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com