पांझरा सौंदर्यीकरण प्रकल्प अधांतरीच

पांझरा सौंदर्यीकरण प्रकल्प अधांतरीच

दहा महिन्यांपूर्वीच केंद्राने प्रस्ताव नाकारल्याचे उघड; राज्याकडे पाठपुराव्याची सूचना

धुळे - शहरातील पांझरा नदी सौंदर्यीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव आर्थिक अडचणींचे कारण देत केंद्र शासनाने दहा महिन्यांपूर्वीच नाकारल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुचविले आहे. केंद्राच्या या पत्रामुळे या प्रकल्पाचे स्वप्न सध्या तरी अधांतरीच आहे.

पांझरा नदी सौंदर्यीकरणासह सांडपाणी प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला होता. २०१३ मध्ये ७७.१९ कोटींचा हा प्रस्ताव २०१४-१५ मध्ये ९९.१९ कोटींचा झाला होता. हद्दवाढीच्या हालचालीनंतर हा प्रकल्प २५२ कोटी ५७ लाख ७५ हजार २४३ रुपयांचा झाला. दोन जुलै २०१५ ला महासभेने प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविला होता.

राज्याकडून मंजुरी
सात जानेवारी २०१६ ला शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी व तत्कालीन संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत पांझरा नदी सौंदर्यीकरणाचा २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंजुरी दिल्याची व प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती दिली होती.

केंद्राकडून प्रस्ताव नाकारला
तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना तीन मार्च २०१६ ला पत्राद्वारे पांझरा नदी सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाबाबत कळविले. या पत्रात जावडेकर यांनी म्हटले आहे, की आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पाअंतर्गत (एनआरसीपी) कोणत्याही नवीन प्रकल्पाचा विचार करणे कठीण आहे. पण, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील वाढीनंतर राज्य शासन अशा प्रकल्पांना निधी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा. याच पत्रात जावडेकर यांनी मालेगाव येथील मौसम नदीचे प्रदूषण कमी करण्याबाबतच्या प्रस्तावाचाही उल्लेख करत ‘एनआरसीपी’अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारता येत नसल्याचे म्हटले आहे.

प्रस्तावातही त्रुटी

श्री. जावडेकर यांनी आपल्या पत्रात पांझरा नदी सौंदर्यीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पाच्या गाइड लाइन्सप्रमाणे नसल्याचेही नमूद केले आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन हा प्रकल्प सध्या नागरी भागासाठी असून, पांझरा सुधारच्या प्रस्तावात धुळे शहरासह लगतच्या गावांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पांझरा सुधारच्या प्रस्तावातच त्रुटी असल्याचे यातून दिसते.

असा होता प्रस्ताव
पांझरा नदी सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत १३ किलोमीटरचे काम समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जॉगिंग ट्रॅक, एलईडी पथदिवे, एमपी थिएटर, गार्डन, जिम गार्डन, स्वच्छतागृहे, घाट, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदी कामांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com