नाशिकमधील पटेलांचे गुजरातकडे प्रयाण

विक्रांत मते
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक - नाशिकच्या विकासात कायम योगदान राहिलेल्या पटेल समाजातील साठहून अधिक कुटुंबांना गुजरातकडे स्थलांतरित व्हावे लागले. गेल्या चार वर्षांपासून शहरातील बांधकाम व्यवसायाची मंदावलेली स्थिती त्यास कारणीभूत ठरली आहे.

नाशिक - नाशिकच्या विकासात कायम योगदान राहिलेल्या पटेल समाजातील साठहून अधिक कुटुंबांना गुजरातकडे स्थलांतरित व्हावे लागले. गेल्या चार वर्षांपासून शहरातील बांधकाम व्यवसायाची मंदावलेली स्थिती त्यास कारणीभूत ठरली आहे.

नाशिक शहरात दोन हजारांहून अधिक पटेल कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पटेलांची घरे येथे आहेत. पूर्वी धार्मिकस्थळ म्हणून नाशिकमध्ये पूर्वज आले. इथल्या वातावरण, मातीने पटेल समाजातील अनेकांना आपले करून घेतले ते आजपर्यंत. कच्छ भागातील भूज जिल्ह्यातील बहुतांश लोक नाशिकमध्ये आहेत. शहरात वास्तव्य करताना रोजगाराबरोबर शहराच्या विकासासाठी मोठे योगदान मिळत आहे. किराणा माल, सॉ-मिल, बांधकाम, तयार खाद्यपदार्थ विक्री, अशा व्यवसायात या समाजाचा वरचष्मा आहे. मुख्यतः बांधकाम व्यवसायात बिल्डर, आर.सी.सी. ठेकेदारांची संख्या मोठी आहे.

अनेक वर्षांपासून शहरामध्ये स्थिरस्थावर झालेल्या पटेलांनी आता गुजरातकडे प्रयाण करण्यास सुरवात केली. राष्ट्रीय हरित लवादाने वर्षभरासाठी बांधकामांवर लावलेल्या बंदीपासून बांधकाम व्यवसायात सुरू झालेला मंदीचा फेरा अद्यापही कायम आहे. बांधकामातील कापटांचा मुद्दा असो की शहर विकास आराखड्यात वाहनतळाचे क्‍लिष्ट नियम, अशा अनेक कारणांनी नाशिकचा बांधकाम व्यवसाय 2014 पासून हेलकावे खात आहे. त्याचा फटका विविध घटकांना बसत आहे.

त्यात अनेक वर्षांपासून नाशिककरांना सेवा देणारा पटेल समाजदेखील अपवाद राहिला नाही. अहमदाबाद, सूरत, बडोदा यांसह मुंबई, पुण्याकडे हा वर्ग व्यवसायासाठी वळला आहे.

पंचवटीतील हिरावाडी, पेठ रोड, मेरी, नाशिक रोड व पौर्णिमा स्टॉप या भागात पटेल समाजाचे वास्तव्य
आर. पी. विद्यालयात गुजराती भाषेतून शिक्षण
या वर्षी तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी दाखले शाळेतून काढले

'नाशिकचा 20 टक्के विकास बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे. पण, व्यवसाय ठप्प झाल्याने गुजरातकडे ठेकेदार वळले आहेत. शाळेतून मुलांचे दाखले काढण्याचे प्रमाण वाढले आहे.''
- ऊर्विष पटेल, संचालक, पंचवटी एज्युकेशन सोसायटी

'बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने रोजगारासाठी नाइलाजाने शहर सोडावे लागत आहे. साठहून अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.''
- ईश्वरलाल पटेल (श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज, नाशिक)

Web Title: patel society gujrat Migration