शेती परत करण्याचे अवैध सावकाराला आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

धुळे - मुलाच्या उपचारासाठी पाच टक्के व्याजाने पैसे घेतलेल्या शेतकऱ्याची जमीन लाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या अवैध सावकाराला त्या शेतकऱ्याची शेतजमीन परत करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश देत जिल्हा उपनिबंधकांनी न्याय दिला आहे. 

धुळे - मुलाच्या उपचारासाठी पाच टक्के व्याजाने पैसे घेतलेल्या शेतकऱ्याची जमीन लाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या अवैध सावकाराला त्या शेतकऱ्याची शेतजमीन परत करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश देत जिल्हा उपनिबंधकांनी न्याय दिला आहे. 

हेंद्रूण (ता. धुळे) येथील वनसिंग राजपूत यांचा मुलगा वीरेंद्र आजारी पडल्याने राजपूत यांनी मुलाच्या उपचारासाठी गावातील विनापरवाना सावकारी करणारे सुरसिंग आनंदा राजपूत आणि रावसाहेब सुरसिंग राजपूत यांच्याकडून दरमहा पाच टक्के व्याजाने दीड लाख रुपये घेतले. त्याची परतफेड होत नसल्याने सावकाराच्या तगाद्यामुळे वनसिंग राजपूत यांनी मदनसिंग राजपूत आणि विजयसिंग राजपूत यांच्या साक्षीने 18 जुलै 2000 ला हेंद्रूण येथील गट क्रमांक 266 (1) मधील पाच हेक्‍टर 21 आरपैकी दोन हेक्‍टर शेतजमीन रावसाहेब राजपूत याच्या नावावर खरेदीखताव्दारे करून दिली. नंतर 12 जानेवारी 2013 ला वनसिंग राजपूत यांनी सावकार सुरसिंग राजपूत व रावसाहेब राजपूत यांना दीड लाखाची रक्कम परत केली. व्याजापोटी पाच लाख 50 हजार मिळून एकूण सहा लाख 90 हजाराची उसनवारीची रक्कम परत केली. 

या व्यवहारानंतर सावकार राजपूत पितापुत्राने शेतजमीनीबाबतचे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करावे आणि शेतजमीन नावावर करून द्यावी, अशी मागणी पीडित वनसिंग राजपूत यांनी केली. मात्र, ही मागणी सावकार पितापुत्राने फेटाळून लावली. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पीडित वनसिंग राजपूत यांनी 12 मार्च 2013 ला गावात संयुक्त बैठक बोलावली. त्यात बेकायदेशीर खरेदीखताच्या व्यवहाराबाबत सावकाराने कबुली दिली. या बैठकीचे चित्रीकरण झाले. तसेच याच बैठकीत सावकाराने व्याजापोटी दहा लाखाची रक्कम दिल्यास वनसिंग राजपूत यांनी खरेदीखत रद्द करून देईल, असे सांगितले. या प्रकरणी सावकार पितापुत्राविरोधात पीडित राजपूत यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे तक्रार केली. 

मंत्रालयाकडून हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशीसाठी आले. त्यानुसार झालेल्या चौकशीत संबंधित सावकाराने काही पीडित नागरिकांच्या जमिनीदेखील खरेदीखताव्दारे नावावर करून घेतल्याचे समोर आले. वनसिंग राजपूत यांच्या शेतजमीन प्रकरणी झालेला व्यवहार बेकायदेशीरच असून राजपूत पितापुत्र अवैध सावकारी करीत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी पीडित वनसिंग राजपूत यांना त्यांची दोन एकर शेतजमीन परत करण्याचा आदेश सावकार पितापुत्राला दिला. पीडित शेतकरी राजपूत यांच्याकडून ऍड. नितीन रायते, ऍड. योगेश सावळे यांनी काम पाहिले.

Web Title: Pawn order to return illegal farm

टॅग्स