पत्नीच्या खुनाबद्दल एकाला फाशी

पत्नीच्या खुनाबद्दल एकाला फाशी

धुळे - येथील कृषी महाविद्यालयातील कर्मचारी वसाहतीत एकाने पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. खून केल्याबद्दल आरोपीस जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्याच्या कुटुंबातील अन्य तिघांना एक महिन्याची सक्तमजुरी ठोठावली. न्यायाधीश श्रीमती पी. एन. नायर यांनी निकाल दिला असून, जिल्हा न्यायालयात वीस वर्षांनंतर फाशीची सुनावल्याने हा निकाल ऐतिहासिक ठरला.

येथील शहरालगत पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयातील चालक नितीन बालकिशन गायकवाड याने पत्नी प्रणिताचा (वय २१) खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २५ जुलै २०१४ ला सकाळी उघडकीस आली होती. महाविद्यालयातील कर्मचारी वसाहतीतील क्वॉर्टरमध्ये तो पत्नीसह वास्तव्यास होता. सकाळी अकराच्या सुमारास नितीनने घरात स्वतःचा गळा व दोन्ही हातांच्या मनगटावर वार केल्याचे निदर्शनास आले. पलंगाजवळ पत्नी प्रणिता गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. याबाबत माहिती मिळताच तत्कालीन पोलिस अधीक्षक जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आझादनगरचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके, उपनिरीक्षक एन. डी. लहांगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला वेग दिला होता. नितीनने चाकू, ब्लेड, विळ्याने प्रणिताच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याचे चौकशीत आढळले होते. पत्नीचा खून केल्या नंतर स्वतःच्या गळा व दोन्ही हातांच्या मनगटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नितीन जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयातील तत्कालीन डॉ. प्रवीण किसनराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन गायकवाड याच्याविरुद्ध पत्नीचा खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. निरीक्षक शेळके, उपनिरीक्षक लहांगे यांनी तपास करीत आरोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले होते.

विवाहानंतर दोन महिन्यांत खून
नितीनचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. त्यानंतर नितीनचा प्रणिताशी घटना घडल्याच्या दोन महिन्यांपूर्वी मे २०१४ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहत असताना अवघ्या दोन महिन्यांत नराधम पती नितीनने तिचा तीक्ष्ण हत्याराने खून केला होता. प्रणिताचे माहेर घोडेगाव (जि. औरंगाबाद) येथील असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी नितीनने सासरच्या मंडळींकडे वारंवार पैशांची मागणी सुरू केली होती. सासऱ्यांनी पैसे दिले होते; परंतु त्यानंतर कौटुंबिक वाद सुरूच होते.

परिस्थितीजन्य पुरावे
खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ जणांची साक्ष तपासण्यात आली. प्रणिताचे वडील भाऊसाहेब रंगनाथ घाणे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ परिसरातील काही साक्षीदार व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार गुन्हा सिद्ध करण्यासाठी शासकीय अभियोक्ता ॲड. जैन यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यासाठी वकिलांनी १९५९ ते ८५ या कालावधीतील सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भही जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.

फाशीची शिक्षा
खटल्यात नितीन गायकवाडला खून केल्याबद्दल मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायाधीश श्रीमती पी. एन. नायर यांनी ठोठावली. नितीनच्या कुटुंबातील विमलबाई बालकिसन गायकवाड, ज्ञानेश्‍वर बालकिसन गायकवाड, पप्पू बालकिसन गायकवाड (सर्व रा. कोळवाडा, राहुरी, जि. नगर) यांनी कौटुंबिक कारणावरून छळ केल्याची प्रणिताच्या कुटुंबीयांची तक्रार होती. त्यानुसार तीन जणांना छळ केल्याबद्दल एक महिना शिक्षा व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस सक्‍तमजुरी ठोठावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील पी. जैन यांनी काम पाहिले.

२० वर्षांनंतर फाशीची शिक्षा
येथील जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात २० वर्षांनंतर प्रथमच फाशीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली. यापूर्वी १९९५-९६ मध्ये एका खटल्यातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती. त्यावेळी जिल्हा शासकीय अभियोक्तापदी ॲड. जे. टी. देसले कार्यरत होते. त्यानंतर सध्या कार्यरत असलेले जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील जैन यांच्या कारकिर्दीत दुसरी फाशीची शिक्षा आज सुनावली गेली. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात गर्दी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com