चित्र प्रदर्शनातून पर्यावरणाचा संदेश भावला

चित्र प्रदर्शनातून पर्यावरणाचा संदेश भावला

चाळीसगाव - ‘सकाळ’ विभागीय कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २९) ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेले मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील अतुल वाघ यांच्या चित्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात त्यांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश वाचकांना चांगलाच भावला. अनेक मान्यवरांसह वाचकांनी अतुल वाघ यांचे कौतुक केले. तर ‘सकाळ’ने तालुक्‍यातील भुमिपूत्राची ओळख या माध्यमातून करून दिल्याने ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. 

येथील गणेश रोडवरील गणेश कॉम्प्लेक्‍सच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले. संपूर्ण जगात पर्यावरणाबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, तरी देखील पर्यावरणाची हानी सुरू आहे. यासाठी विविध छायाचित्रे व पोस्टर्स तयार करून त्याद्वारे राज्यभर अनेक प्रदर्शनातून अतुल वाघ हे पर्यावरण बचावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. यात त्यांची गाजलेली छायाचित्रे व पेंटिंग्जला वाचकांची भरभरून दाद मिळाली. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीयसह इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. 

वाचकांसाठी पर्वणी 
‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले हे चित्रप्रदर्शन वाचकांसाठी पर्वणीच ठरले. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या अतुल वाघ यांनी तयार केलेली पाच हजार छायाचित्रे आहेत.

त्यापैकी पर्यावरण बचावाची निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली होती. ‘झाडे लावा झाडे जगवा’, सायकलिंग, पर्यावरण संवर्धन व रक्षण व पर्यावरण बचावासाठी जनजागृती, निर्माल्यातून खत निर्मिती यासह भविष्यातील पर्यावरणातील दाहकता दाखविणारे विविध पेंटिंग्ज त्याचप्रमाणे सर्वसाधारण चेहऱ्याच्या व्यक्तीला ‘मेकअप’ केल्यानंतर काय बदल होतो, हे दाखवणारे ‘बिफोर आणि अफ्टर’च्या छायाचित्रांना प्रचंड दाद मिळाली. त्यामुळे हे प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी ठरले. 

मान्यवरांकडून कौतुक 
प्रदर्शन पाहणाऱ्या वाचकांना अतुल वाघ यांनी माहिती दिली. अनेकांनी त्यांना भ्रमणध्वनी क्रमांक आग्रहाने घेतला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनातील चित्रांची माहिती व संदेशाची परिणामकारता अतुल वाघ यांच्याकडून जाणून घेतली व आपला अभिप्राय अतुल वाघ यांच्याकडे नोंदविला. या प्रदर्शनातून दिलेल्या पर्यावरण बचावाचा संदेश वाचकांच्या मनाला भिडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. येथील केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भि. अ. गायकवाड, सचिव कमलाकर सामंत यांनी ‘सकाळ’चे निवासी संपादक विजय बुवा यांच्यासोबत प्रदर्शनाचा आस्वाद घेत, प्रत्येक चित्र व छायाचित्रासंबंधी माहिती जाणून घेतली. यावेळी अतुल वाघ यांच्या भोवती वाचकांनी गराडा घातला. गिरणा परिसरातील ‘सकाळ‘च्या वाचकांसाठी आपल्या चित्रांचे असे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करू, असे अतुल वाघ व त्यांचे वडील नानासाहेब वाघ यांनी ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना सांगितले. 

गाजलेल्या चित्रांचा प्रदर्शनात समावेश 
या चित्रप्रदर्शनात अतुल वाघ यांची देशभरात गाजलेली निवडक छायाचित्रे लावण्यात आली होती. यात ‘आहे का रे जिवंत’, ज्वालामुखी, ग्रीन ब्रिगेड जपणूक, पानगळ, वृक्ष, पाणी, हवा, जीवन, जिने की अनमोल दवा, वसुंधरेचा आनंदोत्सव, सावल्या पर्यावरणाच्या, टोक मानवाची, निसर्गाचे प्रदूषण, वलय जळत आहे. प्रदूषणाचे वलय, शहरातील हिरवळ, प्रदूषणाचा पारा, मोनालीसाच्या चेहऱ्यावरील आनंद व दुःखाची भावना, मुकी वेदना, पृथ्वीचा स्वर्ग, मृगजळ, खेळ निसर्गाचा, आता तरी थांबा, वैराळ हिरवळ, राक्षस, अनेक सुंदरता एक, लेस प्रदूषण- बेस्ट सोलुशन यासारख्या चित्रांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com