'गिरणा' परिसरात बिबट्याचे हल्ले थांबेना

'गिरणा' परिसरात बिबट्याचे हल्ले थांबेना

पिलखोड(ता. चाळीसगाव) - 'गिरणा' परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत त्याने दोघांना ठार, तर तिघांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, वन विभागावर सर्व सामान्यांचा रोष पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दोन महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र गिरणा परिसरात सुरूच आहे. काही करता हे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतीच उंबरखेडे(ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असलेल्या अलकाबाई अहिरे यांच्यावर सोमवारी(ता. 11) बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

उंबरखेडेची ही सलग दुसरी घटना आहे. दोन महिन्यांपूर्वी उंबरखेडे येथे आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. महिलेला ठार केल्याच्या घटनेआधी सोमवारी(ता. 11) दुपारी बिबट्याने वरखेडे येथील अन्साराम नाईक यांच्या बोकडाचा फडशा पाडला होता. या सततच्या घटनांमुळे ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान आज पिंपळवाड म्हाळसा येथे सहायक वनसंरक्षक एस. आर. पाटील, एन. ए. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे व मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहाणी केली.

पिंजऱ्याकडे फिरवली पाठ....

गेल्या महिन्यात सायगाव व काकाळणे शिवारात बिबट्याने हैदोस घातला होता. यात एक मुलगी व एक महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. याशिवाय एक वयोवृद्ध महिला किरकोळ जखमी झाली होती. या घटनांमुळे सायगाव अक्षरशः ढवळून निघाले होते. दिवसाही शेतात कोणी जात नव्हते. ग्रामस्थांच्या मागणीवरून त्या भागात पिंजरा लावण्यात आला. मात्र दहा दिवस उलटूनही पिंजऱ्याच्या आजूबाजूला कुठलाच हिंस्त्र प्राणी फिरकलाच नाही.

त्यांनतर बिबट्याने आपला मोर्चा पिलखोड शिवाराकडे वळविला. येथे एका वासराला ठार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. तसेच अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. या भागातही ग्रामस्थांच्या मागणी वरून पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला. मात्र अद्यापही वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्याभोवती बिबट्या फिरकलाच नाही.

दरेगाव परिसरातील हल्ले

दरेगाव येथील रहिवासी अण्णा साबळे(वय 19) या तरुणाची देवघट शिवारात शेती आहे. तो सोमवारी(ता. 11) शेतात काम करत असतांना अडीचच्या सुमारास त्याच्या पायावर हिंस्त्र  प्राण्याने  हल्ला केला.  तसेच शुक्रवारी(ता. 8)  येथील तेरा वर्षीय अंजु पठारे हि मुलगी अनिल मोरे यांच्या शेतात कामासाठी गेली होती.  त्यावेळी तिच्या पाठीवर हल्ला करुन जखमी केले आहे. दरम्यान हे हल्ले बिबट्याने केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर हे हल्ले बिबटचे नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीती कायम

बिबट्याच्या हल्ल्यांचा घटनाक्रम पाहता, शेतकरी व शेतमजुर कमालीचे घाबरले आहेत. उंबरखेडे येथील महिला ठार झाल्याच्या घटनेमुळे साहजिकच सध्या अधिक भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतीत ऐन कामाच्या दिवसांत बिबट्यामुळे खोळंबा होत आहे. त्यामुळे वन विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पाटणादेवी जंगलात अकरा बिबट

पाटणादेवी अभयारण्यात एकुण अकरा बिबट असल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. यंदा अभयारण्य भागात अल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे अभायारण्यातले लहान प्राणी आपल्या खाद्यासाठी जंगलाखाली उतरतात व त्यांच्या पाठोपाठ बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी बाहेर पडत असावेत, अशी शक्यता वन्यप्राणी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

आम्ही पिंपळवाड म्हाळसा येथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. काल त्या भागात पिंजरा लावला.

- संजय एस. मोरे, वन परिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

वृक्षतोडीमुळे प्राण्यांना नसलेली लपन व मानवाकडून त्यांच्या खाद्याच्या होणाऱ्या शिकारीमुळे बिबटे मानवी वस्त्यांकडे व शेतांकडे धाव घेत आहेत.

- राजेश ठोंबरे, मानद वन्यजीवरक्षक, चाळीसगाव

बिबट्याच्या हल्ल्यांचा घटनाक्रम.........

8 जुलै..........उंबरखेडे...........बालक ठार

1 ऑगस्ट........तामसवाडी.........शेळी ठार

15 ऑगस्ट.........काकळणे..........वयोवृद्ध महिला जखमी

16 ऑगस्ट...........सायगाव..........मुलगी व महिला गंभीर जखमी

31 ऑगस्ट............पिंपळवाड म्हाळसा.........वासरु ठार

5 सप्टेंबर................पिलखोड...............वासरु ठार

11 सप्टेंबर................उंबरखेडे................महिला ठार

11 सप्टेंबर...............वरखेडे................बोकड ठार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com