राजकारण जात-पैशांवरच थांबते!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

जळगाव - आज म्हटले जाते, की राजकारणात जात आणि पैसा आणू नये. पण याउलट परिस्थिती पाहावयास मिळते. कारण राजकारणात शेवट तू कोणत्या जातीचा, तुझ्यामागे किती समाज हे विचारले जाते. यामुळे राजकीय क्षेत्र हे जात आणि पैशांवरच येऊन थांबत असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले. 

जळगाव - आज म्हटले जाते, की राजकारणात जात आणि पैसा आणू नये. पण याउलट परिस्थिती पाहावयास मिळते. कारण राजकारणात शेवट तू कोणत्या जातीचा, तुझ्यामागे किती समाज हे विचारले जाते. यामुळे राजकीय क्षेत्र हे जात आणि पैशांवरच येऊन थांबत असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले. 

(कै.) शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ पत्रकार (कै.) सीतारामभाई काळुंखे यांच्या जयंतीनिमित्त आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय वक्‍तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम झाला, यात ते बोलत होते. लेवा भवनात झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय गरुड, विद्या प्रबोधिनीचे योगेश पाटील, उद्योजक सुनील पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अश्‍विनीकुमार काळुंखे, परीक्षक अनिल कोष्टी उपस्थित होते.
आमदार भोळे म्हणाले, की राजकीय क्षेत्र वाईट नसून काम करण्यासाठीचे एक चांगले व्यासपीठ आहे. फक्‍त विचार, भावना चांगल्या असल्या पाहिजेत. आज प्रत्येकजण कमी वेळात श्रीमंती मिळविण्यासाठी धडपडतो आणि यातून चुका करत असतो. समाजात वावरताना कुणालाही मदत करत नाही. केवळ बघ्याची भूमिका वठवतो. मात्र, स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी काम करा. यातून मिळणारा आनंद खूप मोठा आहे. संजय गरुड यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

वक्‍तृत्व स्पर्धेत सारांश सोनार प्रथम
काळुंखे ट्रस्टतर्फे आज घेण्यात आलेल्या वक्‍तृत्व स्पर्धेत "मेक इन इंडिया की चेक इन इंडिया‘, "राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांचे योगदान‘, "खानदेशचा विकास अन्‌ राजकीय उदासीनता‘ हे विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत सारांश धनंजय सोनार याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय- यशपाल ज्ञानेश्‍वर पवार, तृतीय- वर्षा रवींद्र उपाध्ये, उत्तेजनार्थ- नयन मनोहर पाटील, शशिकांत मारोतराव बाबर, गणेश चंद्रकांत साबळे, तुषार दिलीप सूर्यवंशी, उत्कर्षा पाटील राहिले. तसेच उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रसाद जगताप, अमोल सुरवाडे, सौरभ पाटील, सलोनी जोशी यांना सन्मानित करण्यात आले. सुरवातीला ममता वळवी (भगदरी), योगेश झाल्टे (कर्की, मुक्‍ताईनगर), विद्या भोई (खंडेरावनगर), आदेश भादलीकर (शिवराणानगर), तुलसी गवळी (बळीरामपेठ) यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.