रूपाबाईने परतवला बिबट्याचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

रविवारी पहाटे बिबट्याने वाघुरावरून उडी मारून एक चार महिन्यांच्या मेंढीला पकडून ठार केले. त्यानंतर रूपाबाईने हातातील बॅटरीचा प्रकाशझोत बिबट्यावर एकसारखा लावून धरला. त्यामुळे बिबट्याने अर्ध्या तासाने तेथून आपला मुक्काम हलवला. 

निरगुडसर : पहाटे तीनची वेळ. डोंगराजवळ वास्तव्यास असलेल्या मेंढ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली; परंतु मेंढ्यांच्या आवाजाने जाग आलेल्या महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याला शिकार मिळाली नाही. या मेंढ्यांपासून अवघ्या 30 ते 40 फुटांवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याच्या प्रतीक्षेत अर्धा तास ठाण मांडून बसला होता; पंरतु रूपाबाई हिने हातात बॅटरी व काठी घेऊन त्याचा हल्ला परतवून लावला. हा प्रकार निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील गण्याडोंगरानजीक रविवारी पहाटे घडला. 

निरगुडसरपासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या गण्याडोंगराच्या पायथ्याशी सोसायटीचे चेअरमन रमेश मेंगडे यांची शेती आहे. त्यांच्या शेतावर दोन दिवसांपासून भीमा सोमा ठोंबरे या धनगराच्या जवळपास 200 शेळ्या-मेंढ्यांसह त्यांची पत्नी रूपाबाई, 13 वर्षांचा दीर, एक तीन वर्षांचा मुलगा व एक वर्षाची मुलगी वास्तव्यास आहेत; परंतु भीमा ठोंबरे हे शनिवारी ढवळपुरी (जि. नगर) आपल्या गावी गेल्याने पत्नी, दीर व दोन मुलेच पालावर होती. रविवारी पहाटे बिबट्याने वाघुरावरून उडी मारून एक चार महिन्यांच्या मेंढीला पकडून ठार केले. त्यानंतर रूपाबाईने हातातील बॅटरीचा प्रकाशझोत बिबट्यावर एकसारखा लावून धरला. त्यामुळे बिबट्याने अर्ध्या तासाने तेथून आपला मुक्काम हलवला. 

वनविभागाने तातडीने याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी रमेश मेंगडे यांनी केली आहे. ठार झालेल्या मेंढीमुळे संबंधित कुटुंबाचे चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाचे वनपाल मंगेश गाडे, वनरक्षक एस. आर. पाटील, दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला.