एमडी, एमएस, एमडीएसच्या प्रवेशासाठी द्यावी लागणार "नीट'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक - बारावीनंतर वैद्यकीय शाखेच्या एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी यापूर्वीच "नीट' परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. यानंतर आता पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रमात राज्यातील शासकीय, महापालिका, तसेच खासगी महाविद्यालयांत मेडिकल, डेंटल अभ्यासक्रमांच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी देखील "नीट' परीक्षा द्यावी लागणार आहे. नीट पीजी, नीट एमडीएस या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थी 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया काल (ता. 31)पासून सुरू झाली असून, 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. इच्छुक विद्यार्थ्यांना www.nbe.edu.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील.

राज्यात नऊ परीक्षा केंद्रे
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या "नीट' परीक्षेसाठी राज्यात नाशिकसह पुणे, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, नागपूर, जळगाव या केंद्रांसह देशभरातील 129 परीक्षा केंद्रे निश्‍चित केली आहेत. यापैकी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या केंद्रावर परीक्षा देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.