धर्मापल्याडची अशीही वारकरी सेवा!

जळगाव - शेख रियाजोद्दीन अब्दुल गनी (राजूबाबा).
जळगाव - शेख रियाजोद्दीन अब्दुल गनी (राजूबाबा).

जळगाव - जाती-धर्माच्या नावाखाली समाजातील वातावरण दूषित करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, कुठल्याही भक्तीला जाती-धर्माच्या बंधनात बांधले जाऊ शकत नाही, याचा अनुभव अनेकवेळा येतो.

आजपासून जळगावात सुरू झालेल्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाच्या निमित्ताने रामभक्तीत तल्लीन झालेल्या अशाच एका मुस्लिम अवलियाची ओळख झाली. मुस्लिम कुटुंबातील जन्म. वर्गपाठातील रामायण कथा ऐकली अन्‌ हा बालक रामभक्तीत अक्षरश: तल्लीन झाला. कुटुंब, समाजातून तीव्र विरोध होऊनही तो मागे हटला नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून वारीची परंपरा जपणारा सेवेकरी म्हणून त्याची ओळख झाली आहे.

अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनानिमित्त आलेले शेख रियाजोद्दीन अब्दुल गनी (राजूबाबा) यांनी "सकाळ'शी बोलताना वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून कसा आलो आणि संप्रदायात कसा मिसळलो याचा प्रवासच उलगडला. लहानपणापासून रामभक्‍तीत लीन होताना घरातून, समाजातून विरोध झाला. पण हा विरोध पत्करत रामनामाच्या सेवेत लीन झाल्याचे राजूबाबा सांगतात. भारतभर कीर्तन, भजन करत प्रचार- प्रसार केल्याबद्दल 2014 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने राजूबाबांचा सन्मान करण्यात आला आहे.

राम मंदिरात पहिला कार्यक्रम
वारकरी संप्रदायात आणि हिंदू धर्माच्या सोहळ्यात कोणाच्या संगतीने किंवा कोणी सांगितले म्हणून राजूबाबा आले नाही, तर हृदयातील आतल्या आवाजातूनच या मार्गाला वळले. मुस्लिम घरात जन्म झाल्याने मुस्लिम धर्माप्रमाणे घरात वारसा होता. पण हिंदू धर्माची आणि समाजाबद्दलचे प्रेम-आवड आपोआपच निर्माण झाली. नमाज पठण करत असलो, तरी हिंदू धर्मातील ग्रंथसोहळे याची जितकी जाण आहे, तितकी मुस्लिम धर्मातील नसल्याचे राजूबाबा सांगतात. वयाच्या चौदाव्या वर्षी गावात सार्वजनिक कार्यक्रम करू शकल्याने राजूबाबांनी सांगितले.

घरच्यांनी ठेवले कोंडून
हिंदू धर्माप्रमाणे देवाची सेवा करण्याला घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता. मंदिरात गेल्यानंतर तेथील सेवेकरीही हटकायचे, मारायचे. पण मंदिराच्या पायऱ्यांवर बसून रामाचे पारायण ऐकणे सुरूच ठेवले. आषाढीला केज गावातून नगर प्रदक्षिणा दिंडी निघत असे. या दिंडीत टिळा लावून गळ्यात टाळ घेऊन सहभागी झाल्यावर घरच्यांना याबाबत समजले. राम जसे 14 वर्षे वनवासात होते, तसे गावातील काही रामसेवक 14 दिवस वनवासाला जायचे. त्यात जाणार म्हणून घरच्यांची अगदी घरात कोंडून ठेवले होते. पण रात्री कसे दार उघडले कळलेच नाही; लागलीच घरातून पळालो आणि कपिलधाम येथे सेवकांमध्ये सामील झालो, हे सांगताना राजूबाबांचे डोळे पाणावले. वारकरी संप्रदायात आल्यावर मिळालेल्या आनंदापोटी विठोबाच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी, मार्गशीर्ष आणि चैत्र अशा वर्षातील चार "वारी' नियमितपणे करतो, असेही ते सांगतात.

रामभक्तीतून सोडला मांसाहार
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये फाळणीच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात आई, चार भाऊ आणि बहीण होती. गावातीलच सधन शेतकऱ्याकडे कामाला होतो. मालकाच्या मुलाने अभ्यासक्रमातील रामायणाचा पाठ वाचून दाखविला. तेव्हापासून रामायणाची गोडी लागली. नंतर रामाचे चित्र काढणे, त्याचीच पूजा करणे सुरू केले. हे घरच्यांना माहिती नव्हते. हिंदू धर्मातील नियम जाणल्यानंतर मांस खाणे बंद केले. परंतु आई दुसऱ्या भाजीत मांसाची भाजी मिश्रित करून आणायची, त्यावेळी दिवसभर उपाशी राहायचो. हे आईला कळल्यावर तिनेच मांस देणे बंद केले, ते आजपर्यंत बंद असल्याचेही राजूबाबांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com