रामवाडी ते चोपडा लॉन्स रस्ता बनला डंपिंग ग्राउंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

या भागात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज मटेरिअल टाकले जात असल्याबद्दल पंचवटी प्रभाग समितीच्या सभेत वारंवार आवाज उठविला. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीमुळे परिस्थिती अद्यापही 'जैसे थे' आहे.
- मनीषा हेकरे, माजी नगरसेविका

पंचवटी : रामवाडी ते चोपडा लॉन्स व ड्रीम कॅसल ते चोपडा लॉन्स या रस्त्यावर सर्रास मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याने हा रस्ता डंपिंग ग्राउंड बनला आहे. या भागात नागरी वस्ती तुरळक असल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मटेरिअल टाकले जात असल्याचे दिसून येते.

दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर रिंगरोड विकसित करण्यात आले. त्यामागे बाहेरील वाहनांना शहराच्या बाहेर जाण्यासाठी शहरात प्रवेश करण्याची गरज पडू नये, हा हेतू होता. गोदावरीच्या डाव्या तटावर हा सुंदर रस्ता विकसित करण्यात आला. काही काळापूर्वी दिंडोरी रोड, पेठ रोडवरून गंगापूर रोडवर येण्यासाठी शहरात येऊन अशोक स्तंभ मार्गावरून जावे लागत होते. त्यामुळे या भागात वाहतुकीची मोठी कोंडीही होत होती. त्यामुळे सिंहस्थात या रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली. त्यामुळे पंचवटीतून थेट गंगापूर रोडवर जाण्यासाठी जवळचा व कमी गर्दीचा मार्ग उपलब्ध झाला. यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे या रस्त्यांच्या दुतर्फा अद्यापही शेतजमीन टिकून आहे. शेतीमुळे तुलनेत नागरी वस्ती विरळ आहे. मात्र, याच संधीचा फायदा उठवत रात्रीच्या वेळी या रस्त्यावर जुन्या बांधकामातून उरलेले (डेब्रिज) मटेरिअल टाकले जाते.

या प्रश्‍नावर शिवसेनेच्या माजी नगरसेविका मनीषा हेकरे यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत वारंवार आवाजही उठविला होता. त्या वेळी महापालिका अधिकाऱ्यांनी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असे आश्‍वासनही दिले होते; परंतु त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणावर डेब्रिज मटेरिअल टाकले जात आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे मटेरिअल रात्री अंधारात टाकले जात असल्याने व यादरम्यान महापालिकेचे कोणतेही पथक कार्यरत नसल्याने कचरा टाकणाऱ्यांचे फावते.

मृत जनावरांमुळे दुर्गंधी
या भागात नागरी वस्ती नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने सुसाट धावतात. मात्र याच संधीचा फायदा उठवत या भागात मृत जनावरेही टाकली जात असल्याने त्याची मोठी दुर्गंधी पसरते. महापालिका प्रशासनाने मटेरिअल टाकणाऱ्यांसह मृत जनावरे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी येथील मळ्यांमध्ये वस्ती करून राहणाऱ्यांचे म्हणणे आहे.