डोमगावात सापडले दुर्मिळ पेव

डोमगावात सापडले दुर्मिळ पेव
जळगाव - डोमगाव (ता. जळगाव) येथे शासकीय योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींकडून शौचालयासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्यात एका ठिकाणी मोठे भुयार आहे, असे लक्षात आल्यामुळे खोदकाम थांबवण्यात आले. प्रत्यक्षात ते भुयार नसून धान्य साठविण्याचे पेव असल्याचे लक्षात असून, अशा स्वरूपाची चार ते पाच पेव या गावात सापडली आहेत. दुर्मिळ झालेले पेव इतक्‍या संख्येने सापडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना.

डोमगावात राजू वाघ यांच्या घरासमोर खोदकाम सुरू असताना भुयार सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये कार्यरत असणारे इतिहास अभ्यासक भुजंगराव बोबडे आणि पुरातत्त्व विभागाचे विभागीय सहाय्यक संचालक श्रीकांत घारपुरे यांनी गावास भेट दिली. तेथे त्यांनी पाहणी केल्यावर तेथे धान्य साठविण्याचे पेव असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी देखील याच गावात असे पेव मिळाले मिळाले होते. परंतु भीतीपोटी लोकांनी ते बुजवून टाकल्याचे दत्त मंदिराचे पुजारी विक्रम शिरोळे यांनी सांगितले. गावातील राजेश वाघ, गांधी रिसर्च फाउंडेशनचे राजेंद्र जाधव, अरुण काळे यांनी यासाठी सहकार्य केले.

पेव म्हणजे काय?
कृ. पां. कुलकर्णींच्या व्युत्पत्तीकोशात पेव ह्या शब्दाचा उगम खड्डा या अर्थाचा पेयडू/पोयडू असा उल्लेख आहे. पेव हा शब्द कानडीपासून तयार झालेला आहे. "पेव फुटणे' म्हणजे हे शेणा-मातीने लिंपलेले कोठार फुटणे आणि त्यातून धान्य भसाभस बाहेर सांडणे, धान्याची लयलूट होणे असा त्यामागील अर्थ आहे. यासंदर्भात श्री. बोबडे यांनी सांगितले, की डोमगावमध्ये पेवबाबत अनेकांशी बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं, की पेव तयार करताना वापरलेली माती सर्व निकष पूर्ण करणारी आहे. त्यात सर्वांत वरती पाच- सात फूट जाडीचा काळ्या मातीचा थर, त्याच्या खाली दहा ते वीस फुटांपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा थर आहे. तो माण माती, चिकणी माती, चिकण माती, लाल माती, त्याच्या खाली वाळूचा थर आणि सर्वांत खाली पाषाण अशी या पेवांची रचना आहे.

चिकण माती महत्त्वाची
या थरांपैकी सर्वांत महत्त्वाची आहे माण माती/चिकणी माती. ही माती ढासळत नाही. हा मातीचा थर बरंच वजन पेलू शकतो. म्हणून तर आत पोकळी असली, तरी पेव ढासळत नाहीत. या पेवांमध्ये धान्याची पोती भरण्यासाठी तिथपर्यंत भरलेल्या बैलगाड्या आणाव्या लागतात. इतकं वजन पेलून धरण्याची या मातीची क्षमता आहे. या मातीतून पाणी पाझरत नाही. त्यामुळे आतल्या धान्याला ओल लागत नाही, असेही ते म्हणाले.

पेवांची रचना
सर्वांत वर चार सहा फुटांच्या थरात पेवाचं तोंड सरळ उभट असतं. ते सर्व बाजूंनी विटांनी बांधून घेतलं जातं. त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असतं. आढी म्हणजे खाली थोडेसे विटांचे बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचे तोंड आयताकृती दगडाने बंद केले जाते. त्यावर माती टाकून हे तोंड बुजवून टाकतात. पेवाच्या तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी असते. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची उंची साधारणपणे 10 ते 15 फुटांपर्यंत असते. पेवाचा व्यास 15 ते 20 फुटांपर्यंत असतो.

धान्य भरण्याची पद्धत
पेवाच्या तळाशी शेणकुट टाकतात. त्याच्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात. पेवात कडेला उसाच्या वाळलेल्या पेंड्या लावतात. मधल्या भागात धान्याची पोती ठेवतात. पोती ठेवत ठेवत कडेच्या उसाच्या पेंड्यांचा थर वाढवत नेतात. पेवाच्या झाकणापासून खाली पाच फुटांचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंतच धान्याची पोती ठेवली जातात. एका पेवात साधारणतः 150 ते 200 क्विंटल इतके धान्य मावते.

धान्य साठविण्याचे फायदे
पेवात धान्य साठवले, की ते जास्त दिवस टिकते. त्याचा दर्जा सुधारतो, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. डोमगावचे वसंत गोविंद आळवेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पेवातल्या धान्याला कीड लागत नाही. कारण तेथे ऑक्‍सिजन नसतो. एखादे पेव दुपारी बाराच्या सुमारास उघडलं, की त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यात हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्‍सिजन जमा झाल्याचं पाहायला मिळतं. त्यासाठी त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की मगच माणसं आत उतरतात. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नाही. गेलंच तर ऑक्‍सिजन अभावी त्याचा मृत्यू ओढवतो. पेवात चांगलीच उष्णता असते. त्यामुळे धान्य फुगते, त्याचं वजन वाढतं.

जळगाव जिल्ह्यात डोमगावातच इतके पेव का? आता अगदी गरीब दिसणारे हेच गाव पूर्वी अधिक समृद्ध होते का? खानदेशातील या अद्याप अप्रकाशित राहिलेल्या पेव संस्कृतीचा नीट अभ्यास व्हायला हवा.
- भुजंगराव बोबडे, इतिहासाचे अभ्यास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com