रावेरचा पारा 47 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

रावेर - केळी पट्ट्यातील रावेर, मुक्ताईनगरसह हतनूर परिसरात आज 47 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या या तापमानामुळे परिसरातील हजारो हेक्‍टर केळीबागा धोक्‍यात आल्यात आहेत. अजून काही दिवस तापमान पंचेचाळिशीच्या वर राहिले, तर या बागांचे शंभर टक्के नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऍक्‍युव्हेदर संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार रावेर, मुक्ताईनगर, फैजपूर, वरणगाव, हतनूर धरण परिसरात 47 डिग्री सेल्सिअस तापमान होते; तर जळगाव, भुसावळ, चोपडा, एरंडोल, सावदा, यावल, जामनेर येथे 46 डिग्री सेल्सिअस तापमान होते. आज सकाळी 11 वाजेपासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. दुपारी 12 ते 4 पर्यंत रस्ते जवळपास निर्मनुष्यच झाल्याचे चित्र जिल्ह्यात बहुतांश शहरात दिसून आले.