विद्यार्थ्यांची कलाविष्कारातून मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

धुळे - प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर गुरुवारी (ता. २६) मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. यात पारंपरिक पथसंचलनासह विविध कलाविष्कारातून विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. लक्षवेधी सांस्कृतिक कार्यक्रमांनी या कार्यक्रमावर साज चढविला. शहरासह जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शैक्षणिक संस्था, संघटनांतर्फे निरनिराळ्या उपक्रमांसह हा दिन उत्साहात साजरा झाला.    

पोलिस कवायत मैदानावर ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी सव्वानऊला ध्वजवंदन झाले. नंतर संचलनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, महापौर कल्पना महाले, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, ‘एसआरपी’चे समादेशक प्रताप दिघावकर, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सांस्कृतिक कार्यक्रमांचा साज
पोलिस उपअधीक्षक निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना देत पथ संचलन केले. यात पोलिस, ‘एसआरपी’, पोलिस प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड, वन विभाग, एनसीसी, कनोसा, जे. आर. सिटी, मोराणे सैनिक स्कूल, एसएसव्हीपीएस, जिजामाता, श्री जी, न्यू नॅशनल उर्दू, सिंधुरत्न, कमलाबाई आदी शाळांच्या विद्यार्थ्यांसह पोलिस बॅण्ड, श्वानपथकाचा समावेश होता. नंतर मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारासह आदिवासी नृत्य, विद्यार्थ्यांचे अल्टो सॅक्‍सो फोनवरील देशभक्तिपर गीतांना दाद मिळाली. जगदीश देवपूरकर, वाहिदअली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालयासह विविध सरकारी कार्यालये, शालेय संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्कार भारतीसह काही संस्थांनी भारतमातेच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रमही ठेवला होता.