मेंढपाळांकडील बाल मजुराची आराईत सुटका

Rescue of child labor in Satana
Rescue of child labor in Satana

सटाणा - आराई (ता.बागलाण) येथील युवकांची समयसुचकता व महिला सरपंचांची निर्णयक्षमता यामुळे एका वेठबिगार बालमजुराची काल शनिवार (ता.२८) रोजी सुटका झाली. यामुळे ताटातूट झालेल्या एका आई व मुलाची भेट घडवून आणण्यात यश मिळाले असून वेठबिगार बालकास स्वातंत्र्य मिळून जीवनाची नवी दिशा सापडली आहे. काल दिवसभर तालुक्यात या घटनेची एकच चर्चा होती. 

याबाबतचे वृत्त असे की, मुळाणे (ता. बागलाण) येथील मेंढपाळ व्यावसायिक गजमल जिभाऊ शिंदे व देवराम रंभा साबळे (रा. अमरावतीपाडे ता. बागलाण) हे सध्या वाजगाव (ता. देवळा) येथे मेंढ्यांचा व्यवसाय करतात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाला हातभार लावावा यासाठी अर्जुन जिभाऊ ताड (वय १२ वर्षे, रा. आखतवाडे, ता. बागलाण) हा मुलगा शिंदे व साबळे या मेंढपाळ व्यावसायिकांकडे सालदार  म्हणून गेल्या काही महिन्यांपासून वेठबिगारीचे काम करीत होता. अर्जुनची विधवा आई बानुबाई जिभाऊ ताड ही सध्या आराई येथे मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करते. वाजगाव येथे असलेल्या अर्जुनला काही दिवसांपासून आपल्या आईची सातत्याने आठवण येत असल्याने त्याने गजमल शिंदे व देवराम साबळे यांना मला आईला भेटण्यासाठी घरी जाऊ देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी जाण्यास नकार दर्शविल्याने अर्जुनने वाजगाव येथून पळ काढून आराई गाठले व आईची शोधाशोध सुरु केली. इकडे अर्जुन पळून गेल्याने शिंदे व साबळे हे त्याचा शोध घेत आराईला पोहोचले. आराई गावालगत एका शेतात अर्जुन असल्याचे त्यांना समजताच त्यांनी तात्काळ तेथे पोहोचून अर्जुनला गाठले. यावेळी 'मला काम नाही करायचे, मला आईची खूप आठवण येते, मला आईकडेच जायचे', असा हट्ट अर्जुन करू लागला. त्यामुळे गजमल शिंदे व देवराम साबळे यांनी त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

हा प्रकार गावात समजताच सरपंच मनीषा अहिरे, उपसरपंच अनिल माळी व पोलीस पाटील कारभारी भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेत अर्जुनला शिंदे व साबळेंच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर त्या दोघांना ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले. यावेळी सरपंच सौ. अहिरे यांनी दूरध्वनीवरून सटाणा पोलिसांना घटनेची माहिती देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात त्वरित दाखल झाले. मात्र आमच्यावर पोलीस कारवाई करू नका, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, अशा विनवण्या शिंदे व साबळे यांनी केल्याने सरपंच मनीषा अहिरे व उपसरपंच अनिल माळी यांनी त्या दोघांना, आता त्या मुलाकडे काही घेणे असल्यास ते विसरून त्याच्यासाठी काही उपाययोजना करावी. तसेच मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पाच हजार रुपये कुटुंबियांना द्यावे, अशी सूचना करून तसे लेखी लिहून घेतले. त्या पाच हजार रुपयातून अर्जुनचा वैद्यकीय खर्च केला जाणार असून त्याला कपडे व सायकल खरेदी करून दिले जाणार आहे. 

दरम्यान, आराई येथे मोलमजुरी करणाऱ्या अर्जुनच्या आईला ग्रामपंचायत कार्यालयात बोलविण्यात आले. आई दिसताच अर्जुनने पळत जाऊन आईला घट्ट मिठी मारली व हमसून रडू लागला. आई बानुबाईला सुद्धा रडू आवरता आले नाही. या प्रसंगामुळे उपस्थित सर्वांना गहिवरून आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोकुळ आहिरे, सुनिल आहिरे, वसंत आहिरे, जितेंद्र आहिरे, विलास आहिरे, दयाराम आहिरे, दादाजी आहिरे, संतोष आहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com