माजी विद्यार्थ्यांनी दिले शाळेला पुनरुज्जीवन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मी 11 वर्षे शाळेत नोकरी केली. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवले, आज त्या विद्यार्थ्यांनी शाळेला पुनरुज्जीवन देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
- लक्ष्मण महाले, माजी मुख्याध्यापक

वाकटुकी येथील बंद होणारी 'झेड'पी शाळा झाली 'आयएसओ'
जळगाव - धरणगाव तालुक्‍यातील वाकटुकी या छोट्याशा गावात चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेची स्थिती तशी जेमतेमच. गेल्यावर्षी रोडावलेली पटसंख्या पाहता "ड' श्रेणीतली ही शाळा बंद करण्याचे पत्र प्रशासनाकडून येऊन थडकले. वर्षानुवर्षे आपल्या अंगाखांद्यावर खेळवून हजारो चिमुकल्यांना बाराखडी, अंकलिपीपासून पुढे यशस्वी जीवनाची वाट दाखविणारी आपली शाळा अंताकडे जात आहे, ही माहिती मिळताच तिला पुनरुज्जीवन देण्यासाठी सरसावले ते माजी विद्यार्थी. त्यांनी निर्धार केला, कृती केली, दातृत्व दाखवले अन्‌ पाहता पाहता ही बंद होऊ पाहणारी शाळा आज "आयएसओ'ची मानकरी ठरली आहे.

विद्यार्थी पटसंख्या कमी व शाळेला "ड' श्रेणी असल्याने सरकारने शाळा बंद करण्याचे पत्र 2015 मध्ये पाठविले. गावातील भिका पाटील यांना ही गोष्ट समजली. त्यांनी मुख्याध्यापक लक्ष्मण महाले यांच्यासमवेत शाळा नव्याने सुरू करण्यासाठी धडपड सुरू केली. शाळेला नवजीवन देण्यासाठी, विद्यार्थी- पालकांना आकर्षित करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसह अद्ययावत सुविधांसाठी मदत मिळावी, या उद्देशाने गावातील कर्ते-सवरते झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्यात तब्बल 1200 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शाळेची दुरवस्था पाहून त्यांनी शाळेचे रूपडे पालटण्याचा संकल्प सोडला. त्याचवेळी सुमारे एक लाखापेक्षा अधिक देणगी लोकसहभागातून मिळाली. या देणगीतून व उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने अवघ्या एका वर्षात शाळेची गुणवत्ता सुधारण्यात आली. त्यामुळे विद्यार्थिसंख्येत वाढ झाली.

सरकारचीही मदत
मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शाळेला संगणक व प्रिंटर पुरविले; तर माजी विद्यार्थ्यांनी पुस्तके, पाण्याची टाकी, मायक्रोस्कोप व अन्य आवश्‍यक सर्व शालेय साहित्य दिले. सरकारनेही हातभार लावला. या वर्षी सरकारतर्फे बाके व फळा मिळाल्याने शाळेचे अवघे रूपडेच पालटून गेले.

पालकांचा सत्कार
विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. मोलमजुरी करून ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिकविले, त्या मुलांनी आज शाळेचे नाव उज्ज्वल केले, या कृतार्थ भावनेतून या मेळाव्यात पालकांचे ऋण फेडण्यात आले.

वाकटुकी शाळेचे वैभव
- शाळेला मिळाली "आयएसओ'ची मान्यता
- इंग्रजी माध्यमास परवानगी
- शाळेला "अ+' श्रेणीचा दर्जा
- आदर्श शाळा पुरस्काराने घोषित
- पाचवीच्या वर्गाला मान्यता
- मुख्याध्यापकांना आदर्श शिक्षक पुरस्कार