किडनी प्रत्यारोपण झालेल्या सचिनचा शैक्षणिक खर्च पुणे विद्यापीठ करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नाशिक - हृषिकेश हॉस्पिटलमध्ये तिसावी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया दापूर (ता. सिन्नर) येथील सचिन संजय आव्हाड या विद्यार्थ्यावर यशस्वीरीत्या करण्यात आली. या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता आणि केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली.

वयाच्या 19व्या वर्षीच सचिनवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे, डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतिक्षित महाजन, डॉ. प्रणव छाजेड, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. श्‍याम पगार यांनी ही शस्त्रक्रिया केली. सचिनच्या कुटुंबाची
परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे वडील संजय आव्हाड मनोरुग्ण आहेत. सचिनची आई विमन आव्हाड यांनी एक किडनी मुलासाठी दान केली. सचिन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.