काढणीपश्‍चात तंत्रज्ञान अन्‌ हवामान बदलावर होणार विचारमंथन

काढणीपश्‍चात तंत्रज्ञान अन्‌ हवामान बदलावर होणार विचारमंथन

नाशिकमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे आज उद्‌घाटन; गडकरी, महाजन, फुंडकर, रावल, खोतांची उपस्थिती 
नाशिक - राज्यातील फळे, मसाल्याची पिके, भाजीपाला, पुष्पोत्पादनाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेला नाशिकमध्ये उद्यापासून (ता. 5) सुरवात होत आहे. रविवारी (ता. 6) सायंकाळपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत हवामान बदल, मार्केटिंग, काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठीचे तंत्रज्ञान, अन्नसुरक्षा अशा विविध विषयांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ निमंत्रित शेतकऱ्यांशी संवाद साधतील. 
 

"सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मुक्त विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सकाळी दहाला होईल. पालकमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असतील. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, कृषी व फलोत्पादनमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, कृषी-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख पाहुणे असतील. दरम्यान, परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळपासूनच राज्यभरातील शेतकरी शहरात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत बहुतांश शेतकरी मुक्कामी पोचले होते. 

मान्यवर मार्गदर्शक 
महापरिषदेत एकाच छताखाली बागायती पिकांच्या होणाऱ्या विचारमंथनामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. विनय सुपे, बारामतीच्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे डॉ. जगदीश राणे, हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, कृषी आयुक्त विकास देशमुख, हिंदुस्थान युनिलिव्हरचे दक्षिण आफ्रिका आणि आशिया पुरवठाचे सल्लागार डॉ. विजय सचदेवा, "सीफेट'चे माजी संचालक डॉ. आर. टी. पाटील, टाटा केमिकल्सच्या डॉ. सुनीला कुमारी, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या प्रमुख डॉ. बी. आर. साळवी, प्रवीण संधान, विलास शिंदे, नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल बिझनेस अकादमीचे संचालक अमित बुद्धीराजा, ज्ञानेश्‍वर बोडके, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी निर्यात कक्षाचे तंत्र प्रमुख गोविंद हांडे, "महाऑरेंज'चे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे, "महाबनाना'चे वसंतराव महाजन, आंबा निर्यातदार जयंत देसाई, "एनएचआरडीएफ'चे माजी संचालक डॉ. सतीश भोंडे, हेमंत धात्रक हे मार्गदर्शन करतील. ही महापरिषद निमंत्रित शेतकऱ्यांसाठी असली, तरीही त्याअंतर्गत भरवण्यात आलेले कृषी तंत्रज्ञान महोत्सव हे प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुले राहील. कृषी विभागातर्फे नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. याशिवाय, महापरिषदेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारी सकाळी कृषी प्रक्रिया उद्योगांमधील वरुण ऍग्रो, सह्याद्री फार्म, सुला विनयार्डला भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

'साम-मराठी'वरून थेट प्रक्षेपण 
राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेच्या उद्या सकाळी दहापासून सुरू होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण "साम-मराठी' वाहिनीवरून केले जाणार आहे. याशिवाय उद्याच रात्री आठला "हवामान बदल आणि फलोत्पादन' या विषयावर "आवाज महाराष्ट्राचा' हा विशेष कार्यक्रम "साम'वरून प्रसारित होईल. रविवारी रात्री आठला "फलोत्पादन आणि तंत्रज्ञान' या विषयावरील "आवाज महाराष्ट्राचा' हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. 

सोशल मीडियातूनही होणार प्रसारण 
फलोत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या या महापरिषदेतील विचारमंथनासह इतर अपडेट्‌स सोशल मीडियातून जगभरातील नेटिझन्सपर्यंत जाणार आहेत. "ई-सकाळ'च्या www.esakal.com या संकेतस्थळासह "सकाळ'च्या https://www.facebook.com/SakalNews या फेसबुक पेजवरून, तसेच "सकाळ'चे ट्विटर हॅंडल https://twitter.com/eSakalUpdate यावर हे प्रसारण होणार आहे. #HorticultureNext या ट्‌विटर हॅशटॅगवरूनही अपडेट्‌स मिळतील. ट्‌विटरच्या वापरकर्त्यांना याच हॅशटॅगचा वापर करून प्रतिक्रिया, मतेही नोंदवता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com