‘सकाळ’च्या योगदानातून बहरतील शेत शिवारे - जिल्‍हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

अमळनेर - ‘सकाळ’ राज्यभरात विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीत आहे. सिंचनासाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून होत असलेले काम कौतुकास्पद आहे. या योगदानातून शेतशिवारे बहरतील, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सांगितले. 

अमळनेर - ‘सकाळ’ राज्यभरात विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीत आहे. सिंचनासाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून होत असलेले काम कौतुकास्पद आहे. या योगदानातून शेतशिवारे बहरतील, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सांगितले. 

‘सकाळ रिलिफ फंडा’तून सबगव्हाण (ता. अमळनेर) येथे गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, तनिष्का गटप्रमुख मनिषा पाटील, बाजार समितीचे संचालक उदय पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच श्रीराम पाटील, डॉ. अविनाश पाटील, तनिष्का व्यवस्थापक अमोल भट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले, की तनिष्काच्या पुढाकाराने गावात विकासकामे होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उतारा आदी महत्त्वाच्या कागदपत्रांवर महिलांची नावे नोंदवून त्यांना सन्मानित करावे. चौदाव्या वित्त आयोगातून शाळा डिजिटल कराव्यात. या शाळांतून विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण द्यावे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्‍त करून ग्रामस्थांना रोगराईपासून वाचवावे. ‘सकाळ रिलिफ फंडा’तून झालेल्या खोलीकरण व रुंदीकरणात येत्या पावसाळ्यात पाणी साचल्यास पहिल्या जलपूजन कार्यक्रमास मी आमदारांसमवेत येण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले. 

श्री. बुवा म्हणाले, की ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून राज्यभरात विविध भागात नालाखोलीकरण, रुंदीकरण व गावातलवातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यातून जलसिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे. 

तनिष्कांच्या माध्यमातून अनेक गावांनी कात टाकली असून, विकासाच्या वाटेवर आहेत. तनिष्का गटप्रमुख पाटील म्हणाल्या की, ‘सकाळ तनिष्का गटा’मुळे आम्हास व्यासपीठ लाभले आहे. आमच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम तनिष्काने केले आहे. गावपातळीवर कोणत्याही समस्या राहणार नाही यासाठी आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. तनिष्का व्यवस्थापक भट यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’चे बातमीदार उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. तनिष्का सदस्यांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ दखल
जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना तनिष्का गटप्रमुख श्रीमती पाटील यांनी निराधार असलेल्या एका तनिष्का सदस्याची व्यथा मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्या महिलेस कर्ज मंजूर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. यावेळी तनिष्का सदस्यांनी विविध समस्यांच्या पाढा वाचून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. 

आमदार चौधरींकडून ‘सकाळ’चे कौतुक 
‘सकाळ-तनिष्का’मुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन त्या बोलू लागल्याने आनंद होत आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून गावतलावाचे होत असलेले काम कौतुकास्पद आहे. गावविकासासाठी सर्वतोपरी सहकार्यासाठी आपणही नेहमीच प्रयत्नशील आहोत. ‘सकाळ’ सर्वच बाबतीत अग्रेसर आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.