मलांजनच्या शिरपेचात आणखी एक तुरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागात तिसरे

साक्री - स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मलांजनच्या (ता. साक्री) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मलांजनने नाशिक विभागीयस्तरावरील स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. गावाला सहा लाखांचे बक्षीस मिळाले असून, हे वृत्त समजताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

नाशिक येथे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विभागस्तरीय स्पर्धेत हिवरेबाजार (जि. नगर) प्रथम (दहा लाख), अवनखेड (जि. नाशिक) द्वितीय (आठ लाख) आले आहे. पाचही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. 

स्मार्ट ग्राममध्ये पहिला क्रमांक

मलांजन गावात आजवर एकदाही ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. गावात सर्वत्र पक्के रस्ते, वृक्षारोपण, सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालय, भूमिगत गटार, गोबर गॅस, सीसीटीव्ही कॅमेरा, गाव शिवारात जलसंधारणाची कामे, डिजिटल शाळा आदी कामे केलेली आहेत. मलांजन गावास याआधी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय, तर आता विभागात तृतीय क्रमांक मिळाला आहे.

स्मार्ट ग्राम स्पर्धेत मलांजन तालुक्‍यात तसेच जिल्ह्यात देखील अव्वल ठरले आहे. मलांजन गावास याआधी पर्यावरण ग्रामसमृद्धी पुरस्कार तसेच तंटामुक्त गाव पुरस्कारही मिळाला आहे. या आधी तालुक्‍यात तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त करणारे मलांजन गाव आता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत विभागस्तरावरही तिसरे ठरले आहे.

मलांजनच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा नावलौकिक वाढत आहे. भविष्यातही याच पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणार आहे. गावाला आदर्शगाव बनविण्यासाठी आम्ही सारे ग्रामस्थ झटू.
- प्रा. पूनम मराठे, सरपंच, मलांजन