वाळूमाफियांचा नायब तहसीलदारावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

तरी एकाला धरलेच..!
नायब तहसीलदार बोरकर आणि सहकारी पात्रात उतरल्यावर घडल्या प्रकारात दोघे ट्रॅक्‍टर घेऊन पसार झाले; तर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघेही पळून गेले. दगडांचा मारा होतानाही नायब तहसीलदारांनी एका भामट्याची गचांडी पकडण्यात यश मिळवले. त्याचे नाव आनंद यशवंत पाटील (वय 23) असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

जळगाव : तालुक्‍यातील वडनगरी येथे ग्रामस्थांनी अडविलेल्या अवैध उपसा करणाऱ्या 18 वाहनचालकांवर कारवाईची घटना ताजी असली, तरी वाळूमाफियांची मुजोरी वाढतानाच दिसत आहे. वाळू उपसा बंद तर झाला नाहीच, पण गुरुवारी भरदिवसा बांभोरी पुलाजवळून वाळू उपसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांच्या पथकावर या माफियांच्या पंटरांनी दगड-धोंड्यांनी हल्ला चढविला.

नायब तहसीलदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार करत एकाला पकडले; तर उर्वरित संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले. या प्रकरणी पथकाने दोघा वाहनांमधील संशयितांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सप्टेंबर महिनाअखेर गिरणा पात्रातून वाळू उपशाचे सर्वच ठेके पूर्ण बंद आहेत. मुदत संपल्याने वाळू उपसा आणि वाहतुकीस परवानगी नाही. अशाही स्थितीत वाळूमाफियांनी "गिरणा'चे लचके तोडणे सुरूच ठेवले आहे. आव्हाणे-आव्हाणी, वडनगरी आणि आता चक्क निमखेडी ते बांभोरीच्या पुलाखालून वाळूचे बेकायदा उत्खनन होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. भरदिवसा आणि पुलाजवळून वाळू उत्खनन सुरू असल्याचे समजल्यावर वरिष्ठांनी तत्काळ धरणगावचे नायब तहसीलदार तुषार बोरकर यांना फोनवरून आदेश दिला.

असा झाला हल्ला
अव्वल कारकून मनोज शिंपी, पंकज शिंदे यांनी जळगावच्या बाजूने, तर दुसऱ्या एका पथकाने बांभोरी गावाकडून सकाळी 10 वाजता कारवाईसाठी नदीपात्र गाठले. यावेळी एमएच 19सी 8073 या क्रमांकाचे व एक विनानंबरचे असे दोन ट्रॅक्‍टर त्यांनी अडवले. त्यातील संशयितांना ताब्यात घेत असतानाच वाळू चोरट्यांच्या टोळीतील काहींनी सुरवातीला पथकाच्या दिशेने दगडफेक केली. तरी अधिकारी जवळ आले, म्हणून अंगावर वाळूचा मारा करून अंगासह डोळ्यात माती गेल्यामुळे पथकातील कर्मचारी जायबंदी झाले. ही संधी साधत चोरट्यांनी वाहनांसह पळ काढला. दरम्यान, नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तरी एकाला धरलेच..!
नायब तहसीलदार बोरकर आणि सहकारी पात्रात उतरल्यावर घडल्या प्रकारात दोघे ट्रॅक्‍टर घेऊन पसार झाले; तर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघेही पळून गेले. दगडांचा मारा होतानाही नायब तहसीलदारांनी एका भामट्याची गचांडी पकडण्यात यश मिळवले. त्याचे नाव आनंद यशवंत पाटील (वय 23) असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

नदीतून फोन लागेना
श्री. बोरकर यांनी मदतीसाठी तालुका पोलिसांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न कोला. मात्र, नदीपात्रात मोबाईल रेंज नसल्याने पोलिसांना येण्यास उशीर झाला. सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, धर्मराज पाटील, उमेश भांडारकर संजय चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत एकाला ताब्यात घेतले.

प्रांताधिकारी, तहसीलदार बांभोरीकडून जाताना भरदिवसा आणि त्यातही थेट पुलाजवळ उत्खनन होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ आदेश करताच आम्ही पात्रात उतरलो. याचवेळी संशयितांनी आमच्यावर दगडांचा मारा सुरू केला. तरीही आम्ही जवळ गेल्यावर वाळू अंगावर फेकून त्यांनी पळ काढला. पळणाऱ्यांची ओळख पोलिसांनी पटवली असून, त्यांनाही अटक होईलच.
- तुषार बोरकर (नायब तहसीलदार, धरणगाव)

Web Title: sand mafias attack tehsildar