‘जिंदाल’साठी वाजेंची बैठक निष्फळ 

‘जिंदाल’साठी वाजेंची बैठक निष्फळ 

सातपूर/सिन्नर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कारवाईने बंद करण्यात आलेली सिन्नरची जिंदाल सॉ मिल कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत आज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या प्रश्‍नावर विविध मुद्दे उपस्थित करीत तीव्र विरोध केल्याने बैठक निष्फळ ठरली. आज महावितरण कंपनीने व ‘एमआयडीसी’च्या पाणीपुरवठा विभागाने कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची  कारवाई केली.

आज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार वाजे यांच्या उपस्थितीत ‘जिंदाल’चे व्यवस्थापक आर. जे. हर्षवर्धन, महिंद्र शुक्‍ला, आर. के. कहाडळ, ‘एमपीसीबी’चे अधिकारी आर. यू. पाटील, ए. जी. कुडे, ‘एमआयडीसी’च्या विभागीय व्यवस्थापिका संध्या घोडके, तसेच तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, प्रदूषण महामंडळाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अनंत कुडे, मापारवाडीचे शेतकरी शशिकांत गाडे, बाळासाहेब गाडे, ॲड. एन. एस. हिरे, श्री. उगले आदींसह अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.

कोल गॅसीफायर सिस्टिमऐवजी इको फ्रेंडली सिस्टिमचा वापर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत बैठकीत गदारोळ केला. शेतकऱ्यांनी प्रदूषणामुळे शेतीच्या होत असलेल्या नुकसानीचा मुद्दा लावून धरल्याने बैठकीत काहीही निर्णय झाला नाही. 

उद्योग सचिवांकडे बाजू मांडणार
जिंदालचे युनिट हेड दिनेशचंद्र सिन्हा यांच्याशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी औद्योगिक महामंडळाने आज सकाळी पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगितले. कंपनीत उद्याचा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असून, तो संपल्यास उत्पादन बंद पडेल. कंपनीचे त्यामुळे दररोज दहा लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. प्रदूषण मंडळाने गेल्या वर्षी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला आम्ही योग्य उत्तर दिले होते. याबाबत कंपनी उद्या उद्योग सचिवांकडे बाजू मांडणार असल्याचे सांगून त्यांच्या समस्या सामंजस्याने सोडवू. सुमारे पाच हजार कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अडीचशे कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम 
सिन्नरच्या प्रकल्पात हजारो कोटींची गुंतवणूक कंपनीने केली. सध्या तीन हजार कामगार आहेत. कंपनीला इतर कच्चा माल पुरविणारे शेकडो वेंडर असून, त्यात हजारो कामगार आहेत. कंपनीत दरमहा गॅस आणि ऑइलसाठी लागणाऱ्या आठ ते दहा हजार टन पाइपचे उत्पादन केले जाते. कंपनीने नाशिकमध्ये अजून अडीच हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आणलेला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ या योजनेत ‘एमओयू’ करण्यात आला होता. पण, नाशिकमध्ये विरोध होत असेल तर कंपनी ही गुंतवणूक अन्यत्र करेल, असे कंपनीच्या  व्यवस्थापनाने आज स्पष्ट केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com