तारणाच्या धोरणाविरुद्ध ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नाशिक - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होत नाही. अशातच, शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीकडील हात आखडता घेतला आहे. अशा परिस्थितीत एन.पी.ए. वाढू नये आणि भागभांडवल उपलब्ध व्हावे यासाठी रिझर्व्ह बॅंक व नाबार्डच्या नियमांनुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे 1 लाख 15 हजार 772 थकबाकीदारांच्या 129 कोटी 18 लाख रुपयांच्या ठेवींवर तारण लावले आहे. जिल्हा बॅंकेच्या या धोरणाविरुद्ध विविध कार्यकारी विकास सेवा संस्था संघटनेतर्फे आज जिल्हा बॅंकेत ठिय्या आंदोलन केले.

जिल्हा बॅंकेकडून कर्ज मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने जिल्हा बॅंकेत आंदोलन करण्यात आले. या वेळी गोठवलेल्या खात्यांचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला. दोन दिवसांत गोठवलेल्या खात्यांचा आणि कर्जवितरणाचा निर्णय न झाल्यास बॅंकेला कुलूप लावू, असा इशारा देण्यात आला. यापुढे शेतीच्या कर्जाअभावी शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यास त्यास कारणीभूत धरू, असा बॅंकेवर आरोप करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना जाब विचारण्यात आला. दराडे यांनी कोणाचेही खाते गोठवले नाही असे स्पष्ट करत, ठेवींवर तारण लावले असले, तरीही मागेल त्याला पैसे देण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती दिली.

गेल्या 4 एप्रिलला जिल्हा बॅंकेने परिपत्रक काढून 31 मार्चपूर्वी सोसायटीतर्फे कर्ज भरल्यास त्वरित कर्जपुरवठा केला जाईल, असे कळविले होते. कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज देणार असल्याने सोसायटी संचालकांनी काही गावांत ते भरून घेतले. आता जिल्हा बॅंक त्यांनाही कर्ज देत नसल्याची तक्रार आंदोलनावेळी करण्यात आली.