जळगाव जिल्ह्यात सात तालुक्‍यांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

संततधार सुरूच; ‘हतनूर’चे सर्व ४१ दरवाजे उघडले
जळगाव - जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. संततधारेने जनजीवन विस्कळित झाले असून, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ६३.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, जळगाव, यावल, चोपडा, एरंडोल, पारोळा, धरणगाव व जामनेर तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम होता. दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला.

संततधारेमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या तीन वर्षांत सलग तीन दिवस पावसाची झडी पहिल्यांदा होत असल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान, हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सोबतच मध्य प्रदेश व विदर्भातही पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर (ता.भुसावळ) येथील धरणात पाणीसाठा प्रचंड झाल्याने धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. या पावसामुळे हतनूर, वाघूर या मोठ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

सोमवारी सकाळपर्यंतचा पाऊस (मि. मी.मध्ये) -
जळगाव ६९, भुसावळ ४३.५, यावल ६६.५, रावेर ४५.६, मुक्ताईनगर ४५, अमळनेर ४२.५, चोपडा ७८.५, एरंडोल १०५.३, पारोळा ६८, पाचोरा ६१.३, जामनेर ६८, भडगाव ०.७, धरणगाव १२६, बोदवड ०. एकूण सरासरी ५८ मि.मी.

घरांची पडझड, २ बैलांचा बळी
अतिवृष्टीमुळे काही भागात घरांची पडझड झाली आहे. जळगाव शहरात एक घराचे नुकसान झाले, एरंडोल येथे १ तर भडगाव येथे तीन घरांची अल्पशः पडझड झाल्याचे वृत्त आहे. भडगाव तालुक्‍यातील विजेचा धक्का लागून दोन बैल दगावले, तर एका शेळी पुरात वाहून गेली.

जोर कायम राहणार
येत्या चार दिवसांपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली.

Web Title: Seven talukas floods in Jalgaon district