सेस फंडातील कामे कागदावरच! 

सेस फंडातील कामे कागदावरच! 

शिरपूर - "तळे राखेल तो पाणी चाखेल' हा तसा लोकमान्य न्याय; पण सगळे तळेच पिऊन वर रखवालदारीचे नाटक झाल्याचा प्रकार शिरपूर पंचायत समितीच्या सेस फंडाबाबत घडला आहे. केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे चांगभले करून घेतले आहे. सेस फंडाच्या विनियोगाची कसून चौकशी झाल्यास हा घोळ बाहेर येणे शक्‍य होणार आहे. 

पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या गणात विशेष कामे करता यावीत या हेतूने त्यांच्यासाठी सेस फंडाची तरतूद केली जाते. गणाच्या विकासासाठी प्रत्येकाला प्राप्त रकमेच्या आधारे निधी दिला जातो. गणातील कामे निश्‍चित होतात, त्याची देयके तयार करून अदा केली जातात. मात्र, प्रत्यक्षात कामांचा पत्ताच नसतो. याचे कारण सेस फंड म्हणजे सदस्यांसाठी राखीव कुरण असाच अर्थ काहींनी लावून त्याची विल्हेवाट लावली आहे. लाखोंचा हा सेस फंड नेमका कसा व कुठे खर्च झाला, त्यातून खरोखर कामे झाली की नाही, झाली नसल्यास हा पैसा कुणी गिळंकृत केला, याची चौकशी करण्याची गरज आहे. 

गण कुठे, काम कुठे 
स्वतःच्या गणात काम लावल्यास ग्रामस्थांच्या दबावामुळे सेस फंडातून हव्या त्या प्रमाणात वाटा मिळणे शक्‍य होत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी विशिष्ट सदस्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. स्वतःऐवजी इतर सदस्यांच्या गणात आपल्या वाट्याचा सेस फंड निधी द्यायचा, तेथे कामे झाल्याचे दाखवून रक्कम हडप करायची, असा प्रकार घडला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सामील करून घेण्यात आले. वर्षभर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे, वसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा मोबदला म्हणून अधिकाऱ्यांनी संपूर्ण जबाबदारीने हा गोलमाल सिद्ध केल्याचे उघड आहे. "तू मेरे अंगने में, मैं तेरे अंगने में' अशा सहकार्याच्या भूमिकेतून गण बदलत- बदलत झालेली ही कागदावरची कामे पंचायत समितीमध्ये नेमके काय घडते आहे, हे दाखवून देणारी आहेत. 

गुऱ्हाळपाणीचे गुऱ्हाळ 
तालुक्‍यातील निमझरी आणि गुऱ्हाळपाणी येथे सेस फंडातून झालेली कामे विशेष चर्चेत आहेत. पंचायत समितीच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा सेस फंड या कामांवर खर्ची झाल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात या कामांचा कुठेही पत्ता नाही. मात्र, पंचायत समितीमधून या कामांसाठी कागदपत्रे तयार करून देयके अदा करण्यात आली आहेत. ही कामे कुणाच्या शिफारशीने झाली, त्यांची कागदपत्रे कशी तयार झाली, याची चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे. 

"सकाळ'ची चर्चा अन्‌ अधिकारी चिडले 
शिरपूर पंचायत समितीमध्ये अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी सव्वा लाख रुपये अदा करण्यात आल्याचे वृत्त आज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. या बातमीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवरही या बातमीची कात्रणे फिरत असल्याने अधिकारी चांगलेच संतप्त झाले. त्यातून काही कर्मचाऱ्यांना बदली करून टाकेल, अशी तंबी देण्यात आल्याचे कळते. मात्र, त्यानंतरही दिवसभर ही बातमी प्रतिक्रियांसह सोशल मीडियावर फिरत होती. भ्रष्टाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा, मग संताप व्यक्त करा, अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com