पाण्याच्या टॅंकरवरून शहाद्यात हिंसाचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

शहादा - पाण्याचे टॅंकर लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान चाकूहल्ल्यात होऊन त्याचे पडसाद उमटून संतप्त जमावाने दगडफेक, तोडफोड व जाळपोळ केली. या घटनेत चार जण जखमी झाले. त्यापैकी पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांची प्रकृती गंभीर आहे.

शहादा - पाण्याचे टॅंकर लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान चाकूहल्ल्यात होऊन त्याचे पडसाद उमटून संतप्त जमावाने दगडफेक, तोडफोड व जाळपोळ केली. या घटनेत चार जण जखमी झाले. त्यापैकी पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांची प्रकृती गंभीर आहे.

त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून, ठिकठिकाणी दंगानियंत्रण पथकासह कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरातील गरीब नवाज कॉलनीत पाण्याचे टॅंकर लावण्यावरून माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहेमद (मुन्ना) व "एमआयएम'च्या नगरसेविका सायराबी लियाकत अली सय्यद यांचे पुत्र सय्यद मुज्जफर अली सय्यद लियाकत अली यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी गर्दी जमा झाल्याने तेथे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

त्यात सय्यद मुज्जफर अली जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा लहान भाऊ सय्यद नासिर अली व "एमआयएम'चे नगरसेवक तथा पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली रुग्णालयात गेले. तेथे माजी उपनगराध्यक्ष शेख मुख्तार शेख अहेमद यांचे लहान बंधू बाबूलाल अहेमद शेख व साजीद ऊर्फ प्रेम, जावेद, टिपू यांनी तेली व सय्यद नासीर यांच्यावर चाकूने हल्ला केला.

याच दरम्यान एका मोठ्या जमावाने गरीब नवाज कॉलनीतील माजी उपनगराध्यक्ष शेख मुख्तार शेख अहेमद व त्यांचे बंधू माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहेमद यांच्या घरावर दगडफेक केली. त्यात दोन चारचाकी वाहनांसह पोलिस गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.