पतीच्या समजूतदारपणाचा तिने घेतला गैरफायदा !

पतीच्या समजूतदारपणाचा तिने घेतला गैरफायदा !

तीन महिलांशी फारकत घेत चौथीशी विवाह केला, परंतु त्यानंतरही दिसेल त्या महिला- तरुणीवर प्रेमाचे जाळे फेकायचे आणि संबंध प्रस्थापित करायची जणू त्याला सवयच जडली होती. त्यात आणखी एक महिला अलगद अडकली, त्यांच्या संबंधाची चाहूल लागताच त्यात आड येणाऱ्या महिलेच्या पतीलाही त्याने संपविले. आपल्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविणारी महिला पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या प्रयत्नात होती, मात्र पोलिसांनी तपासात महिलेसह आरोपीला हेरले. अनैतिक संबंधाने अखेर महिलेसह दोन जणांचा संसार उध्वस्त झाला.

मेथी (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी भाईदास शिवा मोरे (वय 35) कामासाठी डाबरी (ता. शिंदखेडा) येथे गेला. तेथील चतुर पाटील यांच्या शेतात राहून मोलमजुरी करीत होता. त्याला मूलबाळ नसून पत्नी रेखाशी (नाव बदललेले, वय 20) त्याचा संसार सुखाने सुरू होता. सात ते आठ महिन्यांपूर्वी मात्र संसारात ठिणगी पडली. रेखा परिसरातील घरकुल वसाहतीतील एका दुकानावर रोज घरसामान घेण्यासाठी जात होती. दुकानाजवळच राहणारा भरत भिवसन वाघ याची रेखावर नजर पडली. भरतने तिच्यावर आपले जाळे फेकण्यास सुरवात केली. भरतचा तीन तरुणीशी विवाह होऊन फारकत झाली होती, त्यानंतर चौथीशी विवाह करून त्याचा संसार सुरू होता. त्यानंतर रेखावर त्याची नजर गेल्याने या ना त्या बहाण्याने तो तिच्याशी बोलू लागला, तिच्याशी जवळीक साधत त्याने प्रेमसंबंध निर्माण केले, प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
 

दोघांचे पलायन
रेखा व भरत यांच्या अनैतिक संबंधाची कुणकूण रेखाच्या पतीलाही लागली होती. त्याने रेखाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे काही नसल्याचे सांगत रेखा वेळ मारून नेत होती. दोघांमध्ये संबंध अधिक प्रस्थापित झाल्याने रेखा व भरत पळून गेले, आठ दिवस काही गावांना फिरून दोघे डाबरी येथे परतले. रेखाचा पती भाईदासने समजूतदारपणा दाखवीत रेखाला घरात घेतले. परंतु त्याच समजूतदारपणाचा गैरफायदा रेखा व भरत घेत होता. भाईदास बाहेर गेल्यानंतर भरत दिवसा रेखाकडे येऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित करीत होता. दिवसा भेट न झाल्यास रात्री येत असे.
 

कुऱ्हाडीने वार करून खून
आठ जूनला रात्री भाईदास जेवण करून घराजवळच झोपला, त्याने दारू पिल्याने तो शुद्धीवर नाही, या समजुतीने भरत रेखाला भेटण्यास आला. भरत व रेखा दोघे घरात असतानाच भाईदासला जाग आली, त्याने दोघांना ‘त्या अवस्थेत‘ पाहिल्याने त्याचा राग अनावर झाला. भाईदास ताकीद देत भरतला निघून जाण्यास सांगितले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. भरतने महिलेस ढकलून दिले. भाईदास मारहाण करण्यास सुरवात केली. दारूच्या नशेत असलेला भाईदास प्रतिकार करण्यात कमी पडला. भरतने त्याच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार केले. रक्तबंबाळ होऊन भाईदास खाली कोसळला. भरतने भाईदासला व कुऱ्हाडही जवळच असलेल्या विहिरीत फेकली. यावेळी रेखा जवळच असलेल्या आपल्या नातेवाइकांकडे निघून गेली, भरतही पसार झाला.
 

बनाव झाला उघड
रेखाने नातेवाइकांच्या मदतीने दोंडाईचा पोलिस ठाणे गाठले. पती भाईदास विहिरीत पडल्याचे सांगितले. निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह काढला. विहिरीत दोन ते तीन फूट पाणी होते, भाईदासच्या डोक्‍यावर जखमाही होत्या. त्यावरून खून झाल्याची कल्पना पोलिसांना आली. विहिरीत पडला त्यावेळी रेखा एकटीच असल्याचे सांगत होती, त्यामुळे तूच खून केला काय, अशी विचारणा करीत तिच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला, त्यात रेखाची बोबडी वळली. पोलिस खाक्‍या दाखविताच रेखाने सत्य सांगितली.
भरतसोबत असलेले अनैतिक संबंध, आणि त्यानंतर झालेला खून याबाबत सर्व माहिती तिने पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाला वेग देत चोवीस तासाच्या आत भरतला जेरबंद केले. भरतला ताब्यात घेताच त्यानेही खुनाची कबुली दिली. पतीसोबत सुखी संसार करणाऱ्या रेखाला पतीच्या खुनाची फिर्याद देणे भाग पडले, पतीच्या मृत्यूला अप्रत्यक्ष का होईना तीही कारणीभूत होती.
 

यांनी केला तपास
निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष इंगळे, उपनिरीक्षक चंद्रसिंग ठाकूर, हवालदार मायूस सोनवणे, संजय जाधव, गयासोद्दीन शेख, राकेश ठाकूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com