केल्याने होत आहे रे... शिरपूरसारखे केलेची पाहिजे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर पालिकेने ठोस विकासकामांतून देशभरात वेगळा लौकिक कमावला आहे. लोकांच्याच साथीने, त्यांना विश्‍वासात घेऊन पायाभूत सुविधांचा विकास साधला, तर रोजगार निर्मितीसह शहराचा कायापालट कसा होऊ शकतो, हे शिरपूर शहराने दर्शविले आहे. काँग्रेसचे नेते, आमदार अमरिशभाई पटेल यांचा दूरदृष्टिकोन, त्यांना उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची जोड, त्यास प्रशासकीय इच्छाशक्‍ती व नागरिकांची साथ मिळत असल्याने ‘केल्याने होते रे, शिरपूरसारखे केलीची पाहिजे...’, असे कुणी म्हटले तर वावगे ठरू नये. दशकात पायाभूत सुविधांच्या विकासात शिरपूरने झपाट्याने प्रगती केली आहे. सद्यःस्थितीत सरासरी ७७ हजार लोकसंख्या असलेल्या शिरपूर शहरात ७२ टक्‍क्‍यांपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. सरासरी ८० ते ८५ टक्‍क्‍यांपर्यंत भूमिगत गटारी झाल्या आहेत. तसेच आठ वर्षांपासून ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ प्रणालीद्वारे ‘मिनरल वॉटर’ शहराला पुरविले जात आहे. काही भागांत आता रोज चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना सुरू झाली असून, ते काम पूर्ण होईपर्यंत इतर भागांत रोज दिवसातून दोन वेळा पाऊण तास पाणीपुरवठा केला जात आहे. शहर हागणदारीमुक्त करण्यात शिरपूरने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत चौफेर ८० ते ९० हजार वृक्ष लागवड झाली आहे. सरासरी चाळीस एकर जागेत अत्याधुनिक उद्यान विकसित झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास व बळकटीकरण शिरपूर येथे झाल्याने उद्योग- व्यापाराला पोषक वातावरण निर्माण होऊन रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागत आहे. शिक्षणासह विविध सुविधांच्या विकासालाही वाव मिळाला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासातून शहराची प्रगतीकडे कशी घोडदौड होऊ शकते, हेच शिरपूरने दाखवून दिले आहे.

शिरपूर शहरात रस्त्यांचे ७२ टक्‍के काँक्रिटीकरण

८५ टक्‍क्‍यांपर्यंत भूमिगत गटारी

‘अल्ट्रा व्हॉयलेट’ प्रणालीद्वारे ‘मिनरल वॉटर’

९० हजार वृक्ष लागवड