मी ओवेसींना मारहाण केली- सेना कार्यकर्त्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

 

"मी हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे राम मंदीर आणि देशविरोधी वक्तव्यांच्या मुद्द्यावरून मी त्यांना मारहाण केली. मी हे प्रसिद्धीसाठी सांगितले नाही, असा दावा खर्जुल याने केला.

नवी दिल्ली/मुंबई : हिंदूंच्या विरोधात तसेच राष्ट्रविरोधी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा राग मनात धरून आपण असदुद्दीन ओवैसी यांच्या कानशीलात लगावली, त्यांना मारहाण केली असा दावा शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने केला आहे. दरम्यान, असे काही घडले नसल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले. 

गोरख खर्जुल असे त्या व्यक्तीचे नाव असून, आपण शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता असल्याचे त्याने सांगितले. खर्जुल याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "औवेसी हे नेहमी देशविरोधी बोलतात. ते मला संसदेच्या आवारात भेटले तेव्हा मी त्यांना विचारत होतो की, ते असे का बोलतात.. त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला न राहवल्याने मी त्यांच्या कानाखाली मारली..." 

असदुद्दीन ओवैसी ऑल इंडिया मजलिस-इ-मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष व खासदार आहेत. ते बॅरिस्टर असून, सातत्याने वादग्रस्त राजकीय व धर्मासंबंधी वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहतात. 

"मी हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे राम मंदीर आणि देशविरोधी वक्तव्यांच्या मुद्द्यावरून मी त्यांना मारहाण केली" असे खर्जुल याने सांगितले. 
संसदेच्या आवारात हे कृत्य केले तेव्हा तिथे कोणकोण होतं असं विचारलं असता 'आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. तिथे शांतता होती' असे त्याने सांगितले. 

तिथून आपण मीडिया सेंटरला गेलो आणि पत्रकारांना याबाबत माहिती दिली. मात्र, माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. मी हे प्रसिद्धीसाठी सांगितले नाही, परंतु आज ना उद्या लोकांना हे कळलेच असते, असा दावा खर्जुल याने केला. दरम्यान, मारहाणीचा असा कुठलाही प्रकार आपल्यासोबत घडला नाही असे ओवेसी यांनी सांगितले. 
 

Web Title: shiv sena activist kharjul clams to have slapped owaisi