शिवसेना उमेदवाराला आमदार सीमा हिरेंची मदत 

शिवसेना उमेदवाराला आमदार सीमा हिरेंची मदत 

नाशिक - महापालिका निवडणुकीचा कौल हाती लागल्यानंतर बहुमत मिळालेल्या भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरवात झाली आहे. प्रभाग आठमधील भाजपचे उमेदवार अमोल पाटील यांनी त्यांच्या पराभवास पश्‍चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे जबाबदार असल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या उमेदवाराला उघड मदत करून त्यांच्या विजयाला हातभार लावल्याचा आरोप श्री. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केला. 

प्रभाग आठमधून अमोल पाटील यांना उमेदवारी दिली होती. प्रचारात आमदार हिरे यांना विनवण्या करूनही त्या सहभागी झाल्या नाहीत. प्रभाग आठ भाजपचा बालेकिल्ला आहे. आमदार हिरे यांचे निवासस्थानसुद्धा याच भागात आहे. तीन टर्म त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपचे प्राबल्य असले तरी राजकीय आकसापोटी सौ. हिरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला उघड मदत केली. कार्यकर्त्यांना दमबाजी करून शिवसेना उमेदवारांना मदत करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला. माझा पराभव हाच सीमा हिरे यांचा विजय असल्याचे अमोल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. 

पाटलांनी आत्मपरीक्षण करावे - आमदार हिरे 
अमोल पाटील व त्यांचे वडील दिनकर पाटील यांनी पराभवाबाबत आत्मपरीक्षण केलेले बरे राहील. मी ज्या भागात राहते त्या सावरकरनगर भागातून भाजप आघाडीवर आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परंतु पाटील पिता-पुत्रांनी ज्या भागाच्या ताकदीवर उमेदवारी मागितली, त्या गंगापूर गावातून अवघी शंभर मते मिळाली. त्यामुळे इतरांमध्ये दोष शोधण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. बहुसदस्यीय प्रभाग असल्याने उमेदवार देताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करणे गरजेचे होते. परंतु, एकाच भागातील तीन उमेदवारांना पॅनलमध्ये घेतल्याने मधली पोकळी भरून काढण्यात पाटील यांना अपयश आले. आमदारांविरोधात भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेक आरोप झाले आहेत; परंतु मी पक्ष व कामाशी कधी प्रतारणा केली नसल्याचे आमदार सीमा हिरे यांनी पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com