भुजबळांच्या होमपीचवरील शिवसेना-राष्ट्रवादीतील बेचैनीला पूर्णविराम!

bhujbal
bhujbal

येवला -  राष्ट्रवादी काँग्रेस हेच यापुढील राजकीय कार्यक्षेत्र असल्याचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी पुण्यात जाहीर करताच येथील राजकारणातील तरंग स्थिर होत खाली बसले आहे.मात्र भविष्यात अन आगामी विधानसभा निवडणुकीतही येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.

भुजबळांच्या या खुलाशाने स्थानिक शिवसेनेला हायसे वाटले असले तरी राष्ट्रवादीतही काहीसे हलकेफुलके वातावरण झाल्याने या दोन्ही पक्षातील बैचेनीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज दिसले.मात्र आता भुजबळ लोकसभेला कि विधानसभेला याकडे आता राजकीय धुरीणांच्या नजरा लागल्या आहेत.

येथील राजकारणात २००४ ला भुजबळांची एन्ट्री झाली अन पक्षाचा बोलबाला वाढत जात सर्वच संस्थात राष्ट्रवादी सत्तास्थानी आली होती.प्रचंड विकासातून भुजबळांनी येवलेकरांवर जादू करत त्यांना आपलेसे केल्याने येथील राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढली आहे. मात्र मागील अडीच वर्षांपासून भुजबळ कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकून तुरुंगात अडल्याने येथील विकासाला खीळ बसली आहे.येवढेच नव्हे तर भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाने अनेक निवडणुका गमावल्याचे चित्र आहे.प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे व सहकार नेते अंबादास बनकर यांनी या अडीच वर्षांत पक्षाची धुरा खांद्यावर वाहून नेत संघटन जैसे थे ठेवले असले तरी पक्षीय यशाला मात्र अपयशाची झालर मिळाली आहे.तिकडे माजी आमदार मारोतराव पवार,त्यांचे पुतणे संभाजीराजे पवार,आमदार नरेंद्र दराडे व जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे यांनी एकत्रित येऊन अनेक निवडणुका लढवत विजयश्री खेचल्याने शिवसेनेची ताकद व हिंमत नक्कीच वाढली आहे. मागील तीन वर्षात भुजबळांच्या अनुपस्थितीत येथे सुसाट सुटलेल्या शिवसेनेला मात्र यापुढील राजकारणात नक्कीच अधिक बळ लावावे लागणार आहे.

अशातच दोन आठवड्यापासून तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळांची शिवसेनेशी वाढलेली जवळीक येथील राजकीय अस्थिरता वाढविणारी ठरली होती. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिकच्या जागेवर नरेंद्र दराडे यांनी चुरशीतही मोठय़ा मताधिक्यांनी विजय मिळवल्याने तर त्यांचे बंधू किशोर दराडे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याने येथील जागेवर विधानसभेसाठी संभाजी पवारांची उमेदवारी जवळपास निश्चितच मानली जात आहे.मात्र मध्यंतरी भुजबळ शिवसेनेत येणार असल्याच्या वावड्या उठल्याने येथील शिवसेनेमध्ये बेचैनी वाढली होती. अनेकांनी तर भविष्यातील राजकीय अंदाज बांधत अटकळी बांधल्या होत्या. मात्र भुजबळांनी रविवारी पुण्यात पक्ष प्रेमाच्या केलेल्या खुलाशाने शिवसेनेमध्ये खुशीची लहर पसरली नसल्यास नवलच...

दरडेचे मातोश्रीशी सलोख्याचे संबंध वाढल्याने तेही भगवा खांद्यावर घेऊन आगामी राजकीय वाटचाल करणार हे उघड आहे. त्यामुळे विधानसभेसाठी पवारांच्या सोबत दराडेंचीही ताकद असणार आहे.या उलट भुजबळांसाठी बनकर व शिंदे यांनाच जबाबदारीचा भार उचलावा लागणार असे चित्र आज तरी आहे.भुजबळ लोकसभेसाठी नाशिकमधून लढतील की पुन्हा येवल्यातून नशीब आजमावतील हा भविष्यातील राजकारणाला भाग आहे. मात्र भुजबळ ज्या आवेशाने काल पुण्यात बोलले तो आवेश पाहता त्यांच्या यापुढील राजकीय निर्णयाकडे नजरा लागल्या आहेत. अर्थात यासाठी अजून वर्षांचा अवधी असला तरी राष्ट्रवादी व शिवसेना सामना रंगणार हे मात्र उघड दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com