शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस परिमंडळ दोनने गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून आज हजर राहण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर यांच्यासह आठ जण आज सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर झाले; तर महापालिकेचे गटनेते सुधाकर बडगुजर यांना उद्या (ता. 24) पाचारण करण्यात आले आहे.

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस परिमंडळ दोनने गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून आज हजर राहण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर यांच्यासह आठ जण आज सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर झाले; तर महापालिकेचे गटनेते सुधाकर बडगुजर यांना उद्या (ता. 24) पाचारण करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गुन्हे दाखल असलेल्या सुमारे 251 राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंदर्भातील नोटिसा बजावल्या आहेत.

त्यानुसार आज शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना सदरच्या प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत चौकशीसाठी जुन्या पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले होते.

त्यानुसार, शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख गाडेकर, मंगला भास्कर, ज्योती देवरे, मंदा गवळी, सुनील जाधव, राहुल दराडे यांना उपस्थित राहण्याचे आदेश होते. संबंधितांवर गेल्या वर्षी 22 मार्चला बोधलेनगर येथे राज्य महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा ऍड. विजया रहाटकर यांच्या वक्‍तव्यावरून भारतीय जनता पक्षाच्या महिला मेळाव्यात गदारोळ घातल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्या वेळी शिवसेनेच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला, काही महिलांचे सोन्याचे मंगळसूत्रही चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदरच्या गुन्ह्यानुसारच, संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानुसार, गाडेकर यांच्यासह संबंधित सकाळी साडेदहापासूनच जुन्या पोलिस आयुक्तालयात हजर झाले होते. मात्र, पोलिसांनीही त्यांना दुपारी अडीचपर्यंत ताटकळत ठेवले. अखेर अडीचच्या सुमारास सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासमोर त्यांची चौकशी झाली. त्या वेळी संबंधितांना येत्या शुक्रवारी (ता. 27) जामीनदारांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज बडगुजरांची चौकशी?
दरम्यान, ज्या गुन्ह्यांमध्ये सत्यभामा गाडेकर यांना आज नोटीस बजावण्यात आली, त्याच गुन्ह्यांमध्ये सिडकोतील नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनाही अटक झाली होती. त्यामुळे त्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असून, ते उद्या (ता. 24) सहाय्यक आयुक्तांसमोर हजर राहणार असल्याचे समजते. याचप्रमाणे ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत, त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून परिमंडळ दोन येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्यांमागे आता पोलिसांचाही ससेमिरा लागला आहे.

Web Title: Shiv Sena officials restrictive notices