"राष्ट्रवादी'ला धक्का, येवला पं. स.वर शिवसेनेचा भगवा

"राष्ट्रवादी'ला धक्का, येवला पं. स.वर शिवसेनेचा भगवा
"राष्ट्रवादी'ला धक्का, येवला पं. स.वर शिवसेनेचा भगवा

येवला - धक्कातंत्राचा वापर करून येवलेकर मतदारांनी पंधरा वर्षांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता खाली खेचत प्रथमच शिवसेनेला पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. पंचायत समितीच्या दहापैकी सात जागांवर शिवसेनेचा विजय झाला असून, सत्ताधारी "राष्ट्रवादी'ला केवळ तीनच जागा मिळाल्या; तर जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन जागा शिवसेनेकडे आल्या असून, "राष्ट्रवादी'ला दोनच जागा मिळाल्या.

माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे व युवा नेते संभाजी पवार यांनी एकत्रित केलेले प्रयत्न शिवसेनेच्या यशाला हातभार लावणारे ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र गटबाजीत अडकून पडल्याने याचा मोठा फटका त्यांना बसला. पाटोदा व अंदरसूल गटाच्या जागा "राष्ट्रवादी'ला; तर नगरसूल, राजापूर, मुखेड हे गट शिवसेनेला मिळाले. नगरसूल, सावरगाव, राजापूर, सायगाव, अंदरसूल, नागडे, चिचोंडी या सात जागा शिवसेनेला; तर मुखेड, पाटोदा व धुळगाव गणाच्या जागा "राष्ट्रवादी'ला मिळाल्या.

पाटोद्यात बनकरांची बाजी
आज मतमोजणीला सुरवात होताच "राष्ट्रवादी'ने आपले खाते उघडले. पाटोदा गटाचा अपेक्षित निकाल हाती येत येथून "मविप्र'चे संचालक अंबादास बनकर यांचे पुत्र संजय बनकर यांचा मोठा विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे भास्कर कोंढरे यांचा दोन हजार 854 मतांनी पराभव केला. गटाप्रमाणेच गणातील दोन्ही जागा "राष्ट्रवादी'ने आपल्याकडे ठेवत पाटोदा गणातून सुनीता मेंगाणे विजयी झाल्या; पण शिवसेनेच्या जयश्री बोरणारे यांचा अवघ्या 361 मतांनी पराभव झाला. धुळगाव गणातून मोहन शेलार यांनी शिवसेनेच्या नवनाथ खोडके यांचा 871 मतांनी पराभव केला.

नगरसूलला पवारांचे जिल्ह्यात सर्वाधिक लीड
नगरसूल जिल्हा परिषद गटातील लढत केवळ नावालाच होती. कारण येथे "राष्ट्रवादी'ला उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी भुजबळ समर्थक सुनील पैठणकर यांच्या पत्नी उज्ज्वला पैठणकर यांना रिंगणात उतरविले होते. शिवसेनेने येथून माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा सविता पवार यांना उमेदवारी दिली होती. सौ. पवार यांनी विक्रमी नऊ हजार 447 मतांनी विजय मिळविला. जिल्ह्यातील हे सर्वाधिक मोठे मताधिक्‍य असल्याचे मानले जात आहे. नगरसूलमध्ये चुरशीची लढत होईल, असे सांगितले जात होते. पण, गणातून शिवसेनेचे ऍड. मंगेश भगत यांनी "राष्ट्रवादी'चे सुभाष निकम यांचा दोन हजार 638 मतांनी पराभव केला. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सावरगाव गणात तर शिवसेनेचा विजय अगोदरच ठरलेला होता. येथे आशा साळवे यांना स्पर्धकच नव्हता. कारण, "राष्ट्रवादी'ला उमेदवार मिळालेला नव्हता; तर नाराज शोभा जाधव यांनी पाठिंबा दिल्याने साळवे यांनी सहा हजार 248 मतांनी विजय मिळविला.

राजापूरला दराडेंचीच चलती
लक्षवेधी ठरलेल्या राजापूर गटातून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते नरेंद्र दराडे यांनी गटातील वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या पत्नी सुरेखा दराडे यांनी येथून "राष्ट्रवादी'च्या शकुंतला सोनवणे यांचा सहा हजार 585 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला. राजापूर गणात शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरुड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुमन म्हस्के यांचा एक हजार 706 मतांनी, तर सायगाव गणातून शिवसेनेचे रूपचंद भागवत यांनी "राष्ट्रवादी'चे ऍड. राहुल भालेराव यांचा दोन हजार 864 मतांनी पराभव केला. येथील दोन्ही गण शिवसेनेने राखले असून, दराडे यांनी पवारांच्या मदतीने जोरदार फिल्डिंग लावल्याने येथील धोका टळला.

काट्याच्या लढतीत धक्कादायक निकाल
अंदरसूल गटात काय होणार, याची मोठी उत्सुकता होती. कारण येथील लढत जोरदार झाली होती व निकालही तसाच आला. चुरशीच्या लढतीत "राष्ट्रवादी'चे महेंद्रकुमार काले यांनी शिवसेनेचे उमेदवार मकरंद सोनवणे यांचा 869 मतांनी पराभव करीत विजय मिळविला. येथे शिवसेनेने मागणी केल्याने फेरमतमोजणी झाली. मात्र, त्यानंतरही काले यांच्या मतांची आकडेवारी कायम राहिली. फेरमतमोजणीवेळी दोन्ही गटांत शाब्दिक चकमकी घडल्या. येथील गटाची जागा गमावली असली, तरी गणांच्या दोन्ही जागांवर मात्र शिवसेनेला यश मिळाले. अंदरसूल गणात शिवसेनेच्या नम्रता जगताप यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांच्या स्नुषा राष्ट्रवादी उमेदवार स्वाती सोनवणे यांचा एक हजार 740 मतांनी पराभव केला. आपल्या कामातून ओळख निर्माण केलेले जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण गायकवाड यांनी शिवसेनेची उमेदवारी घेत नागडे गणातून पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या भारती सोनवणे यांचा एक हजार 163 मतांनी पराभव करून विजय मिळविला.

मुखेडला सर्वसामान्य आहेरांना संधी
मुखेड गटात "राष्ट्रवादी'चे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांच्यावरील नाराजीचा फायदा शिवसेनेला झाला. येथे त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार कुसुम गुंड यांचा शिवसेनेच्या कमल आहेर यांनी पराभव केला. सर्वसामान्य शिवसैनिक असलेल्या छगन आहेर यांना सहानुभूतीचा फायदा मिळाला. यामुळे त्यांच्या मातोश्री कमल आहेर यांनी दोन हजार 588 मतांनी गुंड यांच्यावर विजय मिळविला. चिचोंडी खुर्द गणातून अपेक्षित निकाल लागत शिवसेनेच्या कविता आठशेरे विजयी झाल्या. त्यांनी "राष्ट्रवादी' उमेदवार पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या शिवांगी पवार यांचा एक हजार 462 मतांनी पराभव केला. मुखेड गणात उमेदवार चुकल्याचा फटका शिवसेनेला बसला असून, येथे "राष्ट्रवादी'च्या अनिता काळे यांनी विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेच्या पुष्पा नागरे यांचा 642 मतांनी पराभव करून विजय मिळविला.

भाजप व कॉंग्रेसची पाटी कोरीच
मोठा गवगवा करीत सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार दिले; पण निम्म्या उमेदवारांची अनामतही जप्त होण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपसह कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सर्व पंधरा जागांवर शिवसेना व राष्ट्रवादी अशा सरळ लढती होताना दोन्ही पक्षांना तिसरा व चौथा क्रमांक मिळाला. विविध गट व गणांमध्ये शिवसेनेने विजयी आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर "जय भवानी-जय शिवाजी', "आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. या वेळी विजयाच्या घोषणा देताना शिवसैनिक भगवे झेंडे हाती घेत ढोल-ताशांच्या गजरात बेधुंद होत नाचले. निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मतमोजणीदरम्यान शिवसेनेचे संभाजी पवार, युवा नेते कुणाल दराडे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, कांतिलाल साळवे, "राष्ट्रवादी'चे बाळासाहेब लोखंडे, माधव बनकर, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com