श्री श्री रविशंकर करणार नाशिकमध्ये गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सामंजस्य करार लवकरच, मुंबईतील कार्यक्रमाला चित्रफितीतून देणार शुभेच्छा

सामंजस्य करार लवकरच, मुंबईतील कार्यक्रमाला चित्रफितीतून देणार शुभेच्छा
नाशिक - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांची बेंगळुरू येथे भेट घेत "निमा'चे मानद सरचिटणीस डॉ. उदय खराटे यांनी "मेक इन नाशिक' उपक्रमाबद्दलची माहिती दिली. या भेटीदरम्यान श्री श्री रविशंकर यांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. या संदर्भात लवकरच सामंजस्य करार केला जाईल. मुंबईत होत असलेल्या उपक्रमासाठी श्री श्री रविशंकर चित्रफितीद्वारे शुभेच्छा पाठविणार आहेत.

"मेक इन नाशिक'साठी निमातर्फे विविध स्तरांवर आमंत्रण दिले जात असून, अनेक मान्यवरांपर्यंत हा उपक्रम पोचवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून "निमा'चे मानद सरचिटणीस उदय खरोटे यांनी बेंगळुरू येथील आश्रमाला भेट देत श्री श्री रविशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांना या उपक्रमाचा उद्देश व अन्य माहिती दिली. या उपक्रमापासून प्रभावी होत आयुर्वेदिक उत्पादनासाठी नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी श्री श्री रविशंकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच या संदर्भातील सामंजस्य करारदेखील केला जाईल. मुंबईच्या उपक्रमात सहभागींना शुभेच्छा देण्यासाठी श्री श्री रविशंकर चित्रफीत पाठविणार आहेत. "मेक इन नाशिक' उपक्रमात प्रतिनिधीदेखील पाठविणार आहेत.

"हिमालया'लाही आमंत्रण
आयुर्वेद उत्पादनांत आघाडीवर असलेल्या हिमालया कंपनीच्या प्रतिनिधींनाही मेक इन नाशिक उपक्रमात सहभागासाठी आमंत्रित केले आहे. बेंगळुरूस्थित या कंपनीच्या प्रतिनिधींची श्री. खरोटे यांनी भेट घेतली. या उपक्रमात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

रेल्वेमंत्री प्रभूंच्या भेटीनंतर "नीर' नाशिकला येणार का?
"मेक इन नाशिक' उपक्रमासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित केले जात आहे. आज "निमा'चे सरचिटणीस ज्ञानेश्‍वर गोपाळे, खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यापूर्वी रेल्वेचा नीर प्रकल्प नाशिकला येणार अशी चर्चा असताना, आता मेक इन नाशिकच्या निमित्ताने तरी नाशिकमध्ये प्रकल्प सुरू होईल काय, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, श्री. गोपाळे व खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत सुरेश प्रभू यांची भेट घेत उपक्रमाविषयी माहिती दिली. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रणदेखील देण्यात आले.

उद्योगमंत्री देसाईंशी चर्चा
शिवसेनेच्या कार्यक्रमानिमित्त आज नाशिकला उद्योगमंत्री सुभाष देसाई आले होते. या वेळी उद्योजक मंगेश पाटणकर यांनी श्री. देसाई यांची भेट घेत "मेक इन नाशिक' उपक्रमाविषयी त्यांच्याशी चर्चा केली.

नोडल अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
मुंबईत निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी व क्रेडाईचे सुनील कोतवाल यांनी आज मुंबईत नोडल अधिकारी विकास जैन यांची भेट घेतली. मेक इन नाशिक उपक्रमाचा आतापर्यंत आढावा व उपक्रमाची पुढील दिशा या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.