‘श्रीराम’नामाचा घुमला गजर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

रामनवमी - जन्मोत्सव सोहळा उत्साहात; शहरातून भव्य शोभायात्रा

रामनवमी - जन्मोत्सव सोहळा उत्साहात; शहरातून भव्य शोभायात्रा
जळगाव - ‘हे राम...हे राम...’, ‘जय राम श्रीराम जय जय राम’ असा गजर आज जळगावनगरीत दिवसभर घुमत होता. रामनवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यासोबतच ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान व चिमुकल्या राममंदिरासह शहरातील मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात झाला. प्रभूंच्या दर्शनासाठी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी लोटली होती.  शहरातील श्रीराम मंदिर संस्थान व नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राममंदिरात रामनवमीनिमित्त अभिषेक, पूजा होऊन कीर्तन, भजन, प्रवचन असे विविध कार्यक्रम झाले. इतकेच नाही, तर ठिकठिकाणी काही संस्थांतर्फे रामनवमीचे कार्यक्रम आयोजित केले असल्याने आज जळगावनगरी श्री रामचंद्रांच्या नामजपात व मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत होणाऱ्या राम नामस्मरणाने पावण झाली होती.

रामनवमीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे मंदिराच्या बाहेरच नारळ, हार, कुंकू-गुलालासह अन्य पूजेच्या साहित्यांसह खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती. श्रीरामाच्या जीवनावरील पुस्तके, ‘हनुमानचालिसा’सह पूजेच्या विविध वस्तू उपलब्ध होत्या.

भव्य शोभायात्रा
श्रीराम नवमीनिमित्ताने शहरात आज विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. भगवे ध्वज आणि प्रभू श्रीरामांच्या आकर्षक विलोभनीय मूर्ती शोभायात्रेचे आकर्षण ठरत होत्या. सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे शिवतीर्थ मैदानापासून सायंकाळी पाचला शोभायात्रेला सुरवात झाली. यात डि.जे.वर प्रभू श्रीरामांच्या गीतांवर युवा वर्ग हा नाचत होता. तसेच जुन्या जळगावातून श्रीराम ग्रुपच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या साऱ्यांमुळे सायंकाळी सारे वातावरण भक्तिमय झाले होते.

रामनवमी उत्सवाचा समारोप
जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानात परंपरेनुसार यंदाही श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. रामनवमीनिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात पहाटे श्रीरामाच्या चैतन्यमय मूर्तीस अभिषेक करण्यात आला. संस्थानचे विश्‍वस्त गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीरामाची आरती झाली. सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत देवदत्त मोरके यांचे श्रीराम जन्मोत्सवावर कीर्तन झाले. सायंकाळी सहाला शहरातील ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्रांच्या घोषात शांतिपाठ सामुदायिक रामरक्षा होऊन रात्री नऊला संस्कार भारतीच्या कलाकारांनी गीतरामायण सादर केले. श्रीराम मंदिर संस्थानात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून सुरू असलेली गर्दी दिवसभर होती. 

चिमुकले राममंदिरात जन्मोत्सव 
शहरातील मध्यवर्ती भागातील चिमुकले श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते महाआरती झाली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, नगरसेविका सीमा भोळे उपस्थित होते. रामनवमीनिमित्त सकाळी पाचलाच मंदिर खुले करण्यात आले होते. नऊला मनोहर पुराणिक, ऋषिकेश जोशी यांनी अभिषेक केला.

दहाला दादा महाराज जोशी यांनी रामजन्मावर कीर्तन केले. यानंतर दुपारी बाराला भाविकांच्या जल्लोषात श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा झाला. फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीरामचंद्राची प्रतिमा ठेवण्यात आली होती. रामायणावर आधारित गीते, भजने या वेळी सादर करण्यात आली. जन्मोत्सवानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी होती.

छावा संघटनेतर्फे मोटारसायकल रॅली
श्रीराम नवमीनिमित्ताने छाया युवा मराठा महासंघातर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग होता. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय पाटील, खानदेश अध्यक्ष चेतन चांगरे, जिल्हाध्यक्ष कुणाल बारसे, महानगर प्रमुख नीतेश पानसर, दीपक वैराने आदी उपस्थित होते.