आमदार सत्तार यांच्याविरुद्ध सिल्लोडला दुसरा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

सिल्लोड - आमदार अब्दुल सत्तार यांनी हिंदू देव - देवतांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुरुवारी (ता.15) सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे सिल्लोड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मोठे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लक्ष्मण कल्याणकर यांच्या फिर्यादीवरून वीस ते तेवीस जणांविरुद्ध गुरुवारी "ऍट्रॉसिटी' चा गुन्हा दाखल केला आहे.

मोठे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मोबाईलवर बुधवारी (ता. 14) आलेल्या व्हीडीओ क्‍लिपमध्ये अब्दुल सत्तार यांनी दहिगाव (ता. सिल्लोड) येथील शेतात शेतकऱ्यास मारहाण करताना हिंदू देव-देवतांची नावे घेऊन अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांनी द्वेषबुद्धीने समस्त हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यावरून सत्तार यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत भारतीय दंड विधान कलम 295 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

"ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल
दरम्यान, लक्ष्मण कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुक्तार शेख सत्तार, शेख जावेद सत्तार, शेख खलील इब्राहीम, शेख शाहरुख करीम तसेच तीन ते चार अनोळखी महिला व दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दहिगाव येथील गट क्रमांक 38 मध्ये लक्ष्मण कल्याणकर यांनी विकत घेतलेल्या जमिनीमध्ये मका पेरणी करताना सदर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातिवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.