संत निवृत्तिनाथांची दिंडी सिन्नर तालुक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

लोणारवाडीत आज मुक्काम; तर उद्या खंबाळेत

लोणारवाडीत आज मुक्काम; तर उद्या खंबाळेत
सिन्नर (जि. नाशिक) - "दिंडी चालली, चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला' ! अशा अभंगात दंग झालेल्या वारकऱ्याच्या टाळमृदुंगाच्या जयघोषात संत श्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे आज सिन्नर तालुक्‍यात आगमन झाले. नाशिक- पुणे महामार्गावरून दिंडीचा पास्ते घाटातून जामगावमार्गे लोणारवाडीला आजचा मुक्काम असणार आहे.

दिंडीच्या स्वागताची तयारीची लगबग लोणारवाडीत तीन दिवसांपासून सुरू असते. रात्रीच्या मुक्कामाच्या संपूर्ण दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाची तयारी ग्रामस्थांकडून करण्यात येते. घरोघरी पुरणपोळ्या व गुळवणी, रस्सा व भाताची ही मेजवानी असते. प्रत्येक घरातून पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना ग्रामस्थांकडून जेवण दिले जाते. रात्रभर कीर्तनाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांसह दिंडीतील वारकरीही तल्लीन होतात. लोणारवाडीतील विठ्ठलमंदिरासमोर आज दिंडीचा मुक्काम असून, सकाळी सिन्नरहून दातली येथील रिंगण करून खंबाळे (ता. सिन्नर) येथे मुक्कामी जाणार आहे.