काठीच्या राजवडी दसऱ्याचे महत्त्व कायम

धीरसिंग वळवी
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

दोन दिवस होणार सण साजरा; संस्थानचे वारस परंपरा टिकवून

दोन दिवस होणार सण साजरा; संस्थानचे वारस परंपरा टिकवून
सिसा (ता. अक्कलकुवा) - दसरा आणि शौर्य यांच्यातील संबंध पूर्वापार चालत आला आहे. तोच प्रकार सातपुड्यातील गिरिकुंजरातील रेवा-तापी संगम खोऱ्यात बाराव्या शतकापासून सुरू आहे. काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवडी दसऱ्याच्या परंपरेच्या नोंदी 1246 पासून आढळतात. आज या संस्थानचे वारस ही परंपरा टिकवून आहेत. त्या अनुषंगाने काठी येथे 30 सप्टेंबर आणि एक ऑक्‍टोबरला पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा होईल.

रेवा (नर्मदा) आणि तापी या नद्यांच्या मध्यवर्ती सातपुडा पर्वतरांगांतील चौथ्या रांगेत काठी गाव आहे. काठी संस्थान पाडवी घराण्याचे आहे. या संस्थानचे राजे मानसिंग पाडवी शेवटचे राजे होते. त्यांचे वारस पृथ्वीसिंग पाडवी, महेंद्रसिंग पाडवी, रणजितसिंग पाडवी, बहादूरसिंग पाडवी, दिग्विजयसिंह पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी आहेत. काठी संस्थानिकांच्या कागदोपत्री नोंदीनुसार 1246 पासून संस्थान बरखास्त होईपर्यंत सोळा राजे झाले आहेत. काठी येथील राजवडी दसरा राजे उमेदसिंग सरकार यांनी सुरू केला.

असा करतात सण साजरा
दसरा साजरा करण्याच्या पद्धतीनुसार पारंपरिक गाव पुजारा, पोलिसपाटील, राजघराण्यातील व्यक्ती दसरा सणाच्या दहा दिवस आधी पालनी (पवित्रता राखणे) करतात. या दहा दिवसांत रोज काठी गावातील कोलपासाहा (भूमंडळाचा प्रमुख) पूजा करतात. नवव्या दिवशी नोवाय (नवीन वस्तू, धान्य ग्रहण करणे) पूजन केले जाते. दहाव्या दिवशी दोहरा (दसरा), अकराव्या दिवशी पाटी (पूजेच्या वस्तू ठेवलेली पाटी) पूजन केले जाते. हे पूजन ज्या ठिकाणी करतात ती जागा गायीच्या शेणाने सारवली जाते. त्यानंतरच पूजन होते. पूजन केल्यानंतर कपाळावर गायीच्या शेणाचा आणि भाताचा टिळा लावला जातो. ही परंपरा आजही सुरू आहे.

अखंड पूजन
दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून पूजन सुरू असते. दुपारी राजापांठा यांच्या नावाने पूजन केली जाते. नंतर अश्‍वशर्यती होतात. सातपुडा परिसरातील तसेच गुजरात, मध्य प्रदेशातील अश्‍वमालक या स्पर्धेत सहभागी होतात. दहावर्षीय बालकांपासून वयोवृद्ध व्यक्ती अश्‍वस्वार असतात. घोडे जोडीने सोडले जातात. ही स्पर्धा राऊंड पद्धतीने असते. जो घोडा शेवटच्या फेरीपर्यंत टिकतो त्याला विजेता घोषित करण्यात येते. विजेता घोड्याच्या मालकाचा राजपरिवारातील वारसांच्या व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. बाराव्या शतकापासून सुरू असलेली ही परंपरा एकविसाव्या शतकातही सुरू आहे. त्यासाठी आता नियोजनाकरिता राजापांठा मित्रमंडळ सहकार्य करीत आहे.