सामाजिक एकता- अखंडतेसाठी वसा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सिंधी समाजाचे कार्य; उच्चशिक्षणाकडेही आता वाढला कल

जळगाव - फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेला सिंधी समाज आजही हिंदुत्व विचारानुसार चालतो. समाजात एकता, बंधुता, अखंडता टिकविण्याचे काम समाजाकडून सुरूच आहे. चेट्रीचंड उत्सव, झुलेलाल मिरवणूक हे यातीलच महत्त्वाचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.

सिंधी समाजाचे कार्य; उच्चशिक्षणाकडेही आता वाढला कल

जळगाव - फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेला सिंधी समाज आजही हिंदुत्व विचारानुसार चालतो. समाजात एकता, बंधुता, अखंडता टिकविण्याचे काम समाजाकडून सुरूच आहे. चेट्रीचंड उत्सव, झुलेलाल मिरवणूक हे यातीलच महत्त्वाचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.

सिंधी समाजात एकता टिकविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. यात समाजातील विविध घटकांतील समाजबांधवांना विविध सण- उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सामूहिक विवाह सोहळा, सामूहिक जनेवू (मुंडण), झुलेलाल मिरवणूक, वर्सी उत्सव, चेट्रीचंड यांसारख्या उत्सवांसाठी जळगावातील सारा समाज एकत्र येतो. संत कंवरराम, संत झुलेलाल अशा संतांचे विचार व त्यांच्या कार्यातून सिंधी समाजात आजही सलोखा व एकता पाहण्यास मिळते.

समाजासाठीच झुलेलाल मिरवणूक
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा पावसाने दडी मारल्यास वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सिंधी समाजातर्फे झुलेलाल मिरवणूक काढण्यात येत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणूक झाल्यानंतर पावसाच्या सरी बरसतात, असे म्हटले जाते. यामुळे सर्व समाजांकडूनच झुलेलाल मिरवणूक काढण्याची मागणी सिंधी समाजाकडे केली जाते. शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत मरिमातेच्या पूजनासाठी सर्व समाजांतील मान्यवरांना आमंत्रित केले जात असते.

सिंधी पंचायतीद्वारे राखला जातो सलोखा
जळगावात स्थायिक झालेल्या सिंधी समाजाच्या पोटजातीनुसार पंचायत स्थापन करण्यात आली आहे. या पंचायतींद्वारे होणारे भांडण- तंटे, घटस्फोट अशा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात; परंतु या पंचायतीत समस्या सुटत नसेल, तर सिंधी समाज सेंट्रल पंचायतीत याचा निकाल लावला जातो. याशिवाय, सिंधी पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त लग्न सोहळे पार पाडले जातात. यात पंचायतीने ठरवून दिल्याप्रमाणेच अन्न वाया जाऊ नये म्हणून जेवणाची व्यवस्था, वेळेवर लग्न लावणे, फटाके न फोडणे या नियमांचे पालन केले जाते. तसेच पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास त्यांच्यात समेट घडविणे किंवा घटस्फोट मिळवून देण्याचे कार्यदेखील पंचायत करीत असते. समाजातील भांडण- तंटे व समस्या या पंचायतीच्या माध्यमातून सोडविल्या जात असल्याने ना कोर्टाची, ना पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ सिंधी समाजबांधवांवर येत नाही.

व्यवसायाकडून आता उच्चशिक्षणाकडे...
सिंधी हा प्रामुख्याने व्यापार- उद्योग करणारा समाज म्हणून ओळखला जातो. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणे, हीच परंपरा आतापर्यंत समाजात पाहण्यास मिळाली आहे. यामुळे पूर्वी शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जायचे नाही; पण सिंधी समाजही आता व्यवसायाकडून उच्चशिक्षणाकडे वाटचाल करीत आहे. एमबीए, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या उच्चशिक्षणाच्या पदव्या घेऊन व्यवसाय सोडून नोकरी करण्याकडेदेखील समाज वळत आहे.
 

सिंधी समाज हिंदू तत्त्वानुसार चालत आला असल्याने समाजात एकता, अखंडता राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. शिवाय, सिंधी पंचायतीतर्फे समाजातील लग्न सोहळे ठरवून दिल्याप्रमाणे लावले जातात आणि समाजातील काही समस्या असल्यास त्या सिंधी पंचायतीच्या माध्यमातून सोडविल्या जातात.
- अशोक मंधान, कार्यवाह अध्यक्ष, कंवरनगर उच्च पंचायत (उभावडो, बवालपूर)