सोनई हत्याकांडातील आणखी एका आरोपीची प्रकृती बिघडली

Nashik-Road-Jail
Nashik-Road-Jail

नाशिक - राज्यभर गाजलेल्या सोनई (जि. नगर) हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आणखी एका आरोपीची प्रकृती बिघडली, त्यामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत, नाशिकरोड पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या "तमाशा'मुळे आरोपीला वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाला. अखेर कारागृह प्रशासनानेच आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले.

सोनई दलित हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेला आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंदले (39) यास गुरुवारी (ता. 12) रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास छातीत दुखू लागले. त्याची तक्रार त्याने कारागृह प्रशासनाकडे केली असता, त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सोडून प्रशासनाने नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले.

कारागृह प्रशासनाकडून अचानकपणे आलेल्या सूचनेबद्दल नाशिकरोड पोलिसांनी आश्‍चर्यच व्यक्त केले. कारागृहातील आरोपीला आरोग्यविषयक तक्रार असल्यास त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी ही कारागृह प्रशासनाची असल्याचे नाशिकरोड पोलिसांनी स्पष्ट केले. तरीही कारागृह प्रशासनाने सदरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

अखेरीस नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी शिक्षेतील आरोपी कारागृहात असताना त्याच्यावर उपचाराची जबाबदारीही कारागृह प्रशासनाचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कारागृह प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा आरोपी प्रकाश दरंदले यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पोलिस आणि कारागृह प्रशासनाच्या वादामध्ये सुमारे तास-दीड तासाचा कालावधी निघून गेला. दोन आठवड्यांपूर्वीच 23 जून रोजी सोनई हत्याकांडातील आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले (55) याचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com