क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

देशातील क्रीडा क्षेत्रासमोरील प्रश्‍नांची बाम यांना सखोल जाण होती. त्यामुळे क्रीडाविषयक धोरणांसाठी त्यांचे मार्गदर्शनही घेतले जात असे. बाम यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये विपुल लेखन केले. 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीमध्येही त्यांनी एक वर्षे सलग लेखमाला लिहिली होती. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.

नाशिक : ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे नाशिकमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍याने आज (शुक्रवार) निधन झाले. कणखर मन आणि कणखर शरीर क्रीडांगणावरच होते, अशी त्यांची धारणा होती. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुमा शिरूर, अंजली भागवत यांच्यासारख्या दिग्गजांना मार्गदर्शन केले होते. 

भीष्मराज बाम हे राज्याचे माजी पोलिस महासंचालक होते. त्यांना राज्य सरकारने 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरविले होते. नाशिकमध्ये आज एक जाहीर व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचे निधन झाले. 

खेळाडूंची कामगिरी खालावलेली असताना त्यांना येणाऱ्या नैराश्‍यातून बाहेर काढण्याची बहुमोल कामगिरी बाम यांनी केली. भारतीय नेमबाज जागतिक स्तरावर कुठेच नसताना बाम यांनी या नेमबाजांना एकाग्रतेविषयी मार्गदर्शन केले. नेमबाजी आणि तिरंदाजी हे दोन्ही खेळ एकाग्रतेशी निगडीत आहेत. त्यामुळे नेमबाज आणि तिरंदाजांना त्यांनी एकाग्रता वाढविण्याचे प्रशिक्षण दिले. यातूनच इतरही अनेक खेळाडूंनी त्यांचे मार्गदर्शन घेतले. 

देशातील क्रीडा क्षेत्रासमोरील प्रश्‍नांची बाम यांना सखोल जाण होती. त्यामुळे क्रीडाविषयक धोरणांसाठी त्यांचे मार्गदर्शनही घेतले जात असे. बाम यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये विपुल लेखन केले. 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीमध्येही त्यांनी एक वर्षे सलग लेखमाला लिहिली होती. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.

Web Title: Sports Psychologist Bhishmaraj Bam is no more