'आयसीयू'तून मयूर देणार दहावीची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

हाड मोडूनही करिअरचा सांधा जुळविण्याचा निर्धार; मंडळाची परवानगी
नाशिक - दहावीच्या परीक्षेला उद्या (ता. 7) पासून सुरवात होत आहे.

हाड मोडूनही करिअरचा सांधा जुळविण्याचा निर्धार; मंडळाची परवानगी
नाशिक - दहावीच्या परीक्षेला उद्या (ता. 7) पासून सुरवात होत आहे.

परीक्षेला सामोरे जाण्याच्या काही दिवसांआधीच अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर वाघ यास परीक्षेला मुकावे लागण्याची वेळ ओढावली होती; मात्र पालकांनी शिक्षण मंडळाकडे केलेल्या अर्जावर सहानुभूतिपूर्वक विचार करत मयूरला अतिदक्षता विभागातून (आयसीयू) लेखी परीक्षा देण्यास मंडळाने संमती दिली. या परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा निर्धार त्याने केला आहे.

मयूर वाघ हा मालेगाव येथील केबीएच विद्यालयातील विद्यार्थी आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मयूरही गेल्या काही दिवसांपासून दहावी परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त होता. दरम्यानच्या काळात 1 मार्चला दुचाकीने जात असताना त्याचा अपघात होऊन उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले. त्याला मालेगाव येथील बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3 मार्चला शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरू असून, पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. त्यातच उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत असल्याने मयूरने परीक्षा देण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानुसार पालकांनी नाशिक विभागीय कार्यालय गाठून अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात निवेदनाद्वारे विनंती करत मयूरला लेखी परीक्षा देण्याची परवानगी मागितली. रुग्णवाहिकेतून केंद्रावर येण्यासारखी परिस्थितीदेखील नसल्याने मयूरला रुग्णालयातील "आयसीयू'मध्येच परीक्षा देण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

विशेष खबरदारी बाळगली जाईल
बारावी परीक्षेमध्ये पेपरच्या वेळेपूर्वीच प्रश्‍नपत्रिका व्हायरल होत असल्याचे प्रकार मुंबईसह काही ठिकाणी घडत आहेत. ही गोष्ट लक्षात घेता रुग्णालयात सतर्कता बाळगली जाणार आहे. परीक्षा कालावधीत "आयसीयू'मध्ये कुणीही ये-जा करणार नाही. प्रश्‍नपत्रिकेची गोपनियता पाळली जाईल, यासह अन्य सावधगिरी बाळगली जाणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.