काश्‍मीरमधील पर्यटकांच्या मदतीला धावून आले राज्यमंत्री डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूरवासीयांचा समावेश
नाशिक - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी  युद्धपातळीवर सरकारी यंत्रणा हलविल्याने सोमवारी काश्‍मीर खोऱ्यात अडकून पडलेल्या ५२ पर्यटकांचा चमू सुखरूप जम्मूकडे रवाना झाला.

मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूरवासीयांचा समावेश
नाशिक - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी  युद्धपातळीवर सरकारी यंत्रणा हलविल्याने सोमवारी काश्‍मीर खोऱ्यात अडकून पडलेल्या ५२ पर्यटकांचा चमू सुखरूप जम्मूकडे रवाना झाला.

डॉ. भामरे इंदूरकडे निघालेले असताना पहेलगाममध्ये (काश्‍मीर) अडकलेल्या एका भाविकाने त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. जम्मूला जाणे मुश्‍कील झाल्याची माहिती मिळताच, डॉ. भामरे यांनी संरक्षण मंत्रालयाशी संपर्क केला. काश्‍मीरमध्ये सैन्यदलाला सूचना देऊन भाविकांना पुढे रवाना करावे, अशी सूचना केली. त्यानुसार पहेलगाममधून ५२ भाविकांचे वाहन सुरक्षा दलाने मार्ग करून देत जम्मूकडे रवाना केले.

अमरनाथ दर्शनाहून परतलेल्या नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीची बस काश्‍मीर खोऱ्यातील अशांततेमुळे अडकून पडली होती. ही बस सुरक्षा दलाने बाहेर काढल्याने राज्यातील मुंबई, पुणे, उस्मानाबाद, धुळे, मलकापूर, नाशिक, धुळे व कोल्हापूर आदी विविध भागांतील भाविकांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, सर्व जण वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोचल्याची माहिती मिळाली. अमरनाथ दर्शनासाठी आज जवळपास तीनशे वाहने सोडण्यात आली असून, बाल्टाल भागात अजूनही पाच हजारांपर्यंत भाविक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, यात्रा कंपनीचे प्रमुख ब्रिजमोहन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ दर्शनाहून उद्या (ता. १२) सकाळपर्यंत कंपनीची एक बस
पहेलगाममध्ये दाखल होईल. सैन्य दलाच्या मदतीने याही भाविकांचा पुढील प्रवास सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणीचा खातमा करण्यात आल्याने काश्‍मीर खोऱ्यात हिंसक पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रा बंद करण्याबरोबरच काश्‍मीर खोऱ्यात भाविक अडकून पडण्याची घटना घडली.

सर्व भाविक सुरक्षित
जिल्हा प्रशासनातर्फे सर्व भाविक सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौधरी यात्रा कंपनीने २६ भाविक अमृतसरमध्ये, दिंडोरी तहसीलदारांनी अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सर्व भाविक, तर निफाड तहसीलदारांनी कटरा येथे ४२, जम्मूमध्ये ९०, भगवतीनगरमध्ये ४०, बालटालमध्ये १८, तर पहेलगाममध्ये नऊ भाविक सुरक्षित असल्याचे सांगितले.

Web Title: State of Jammu and Kashmir to help rescue tourists were Dr. Bhamare