धुळे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानवर शुक्रवारी रात्री अकरानंतर दगडफेक झाली आहे. या प्रकाराचा शनिवारी दुपारनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

धुळे - धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानवर शुक्रवारी रात्री अकरानंतर दगडफेक झाली आहे. या प्रकाराचा शनिवारी दुपारनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील मयूर कॉलनीत असलेल्या धायगुडे यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी रात्री अकरा नंतर अज्ञातांनी दगडफेक केली. या प्रकरणी सुरक्षारक्षक छगन धनगर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे. दगडफेक नेमकी कोणी आणि का केली याचा पोलिस शोध घेत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना, समाजवादी पक्षाचे काही नगरसेवक विरुद्ध आयुक्त असा सामना पाहायला मिळतो आहे.

नगरसेवकांचे महानगरपालिका प्रशासनाविरूद्ध आंदोलन
गणपती मंदिर रस्त्यावरील सिद्धेश्‍वर हॉस्पिटलजवळ जीवघेणा खड्डा होता. तेथे रांगोळी काढून भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी ठाण मांडत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. यापाठोपाठ शिवसेनेचे महानगर शाखाप्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त धायगुडे यांना निवेदन दिले गेले. शहरासाठी असलेल्या जलस्त्रोतांमध्ये मुबलक साठा असूनही केवळ प्रशासनाचे नियोजन नसल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे, कृत्रिम टंचाईची झळ नागरिकांना सोसावी लागत असल्याची तक्रार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. समाजवादी पक्षानेही पाण्यासह इतर प्रश्‍नांवर थेट महापालिकेत आंदोलन केले. या स्थितीवर महासभेत नगरसेवकांनी आयुक्तांसह यंत्रणेला धारेवर धरले आणि जाब विचारला.

नोटीसांसह आयुक्‍तांचे "दंडास्त्र'
टीकेचा भडिमार सोसावा लागत असल्याने आयुक्त अस्वस्थ झाल्या. त्यांनी या स्थितीस जबाबदार, कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर "दंडास्त्र' उगारले आहे. यात त्यांनी सहाय्यक आयुक्त, अभियंता, ओव्हरसियर दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड, तर इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तसेच भाजप नगरसेविका चौधरी, समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमिन पटेल, सय्यद साबीर अली मोतेवर, शेख फातिमा शेख गुलाब यांना भोगवटा प्रमाणपत्र, घराच्या बांधकाम परवानगीबाबत नोटीस बजावली आहे. आयुक्त सूडबुद्धीने आंदोलनकर्त्या चार नगरसेवकांविरुद्ध कारवाई करत असल्याचा संबंधितांचा आरोप आहे. त्याविषयी काहीही न बोलता आयुक्तांनी या चार नगरसेवकांची सुनावणी घेतली आणि त्यांना कागदपत्रे सादर करण्याची सूचना दिली. त्यामुळे चिडलेल्या समाजवादी पक्षाने आयुक्त निवासस्थानाचा विषय उकरून काढला आहे. आयुक्तांचे निवासस्थान उद्यानात आहे. त्यामुळे उद्यानाचा परिसरातील आबालवृद्धांना लाभ घेता येत नाही. आयुक्त निवासस्थान हटवावे व नागरिकांना उद्यान खुले करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

दगडफेकीचा गुन्हा दाखल
शहरात असा वाद रंगलेला असताना शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील मयूर कॉलनीत असलेल्या आयुक्त धायगुडे यांच्या घरावर रात्री अकराला दगड पडल्याने आवाज झाला. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. नंतर पुन्हा तीन दगड पडले. त्यामुळे वॉचमन, पोलिस कर्मचारी धावले आणि त्यांनी समाजकंटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तोवर ते पसार झाले. ही माहिती आयुक्त धायगुडे यांनी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना जाहीर करीत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणे दूरच, उलट...

01.21 PM

नाशिक - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला....

01.12 PM

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राधिकरणाच्या विविध गटांसाठी झालेल्या निवडणुकीत व्यवस्थापन परिषदेच्या गटातील चुरशीच्या लढतीत...

01.12 PM