उन्हाळ कांद्याच्या भावातील घसरणीने शेतकरी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नाशिक - उन्हाळ कांद्याच्या भावात आगमनाला घसरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाच वर्षांत पहिल्यांदा नीचांकी भावाने कांद्याची विक्री करावी लागली आहे. त्यातच आता डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम होत असतानाच निर्यातीचे पैसे डॉलरमध्ये मिळत असल्याने टनामागे 900 रुपये कमी मिळू लागले. अशा परिस्थितीत निर्यातीसाठी देण्यात येणाऱ्या 5 टक्के अनुदानाची मुदत वाढविण्यावर सारी भिस्त अवलंबून आहे.

कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत 2012-13 ला मार्चमध्ये क्विंटलचा सरासरी भाव एक हजार 16 रुपये राहिला होता. 2013-14 मध्ये हाच भाव 841 रुपये होता. 2014-15 मध्ये एक हजार, तर गेल्या वर्षी 720 रुपये असा निघाला होता. यंदा "मार्चएंड'च्या कामकाजासाठी लिलाव बंद होण्यापूर्वी 567 रुपये, असा भाव मिळाला. जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज लिलाव सुरू झाल्यावर 12 हजार क्विंटल कांदा लासलगावात शेतकऱ्यांनी विक्रीला आणला होता. उन्हाळ कांद्याला 400 ते 636 आणि सरासरी 575 रुपये क्विंटल, असा भाव मिळाला.

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनात कांद्याच्या विषयावर चर्चा झाली असताना, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कांद्याच्या
निर्यातीसाठी देण्यात येणारे 5 टक्के अनुदान मुदत वाढवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही दिली होती. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही निर्यात अनुदान सुरू ठेवण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्यातर्फे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला यासंबंधी प्रस्ताव पाठविण्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पुरेशा कांद्याचे उत्पादन अपेक्षित
देशात यंदा 80 ते 90 लाख टनापर्यंत उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. उन्हाळ कांदा सहा महिने टिकत असल्याने देशवासीयांना खाण्यासाठी 60 लाख टन कांद्याची आवश्‍यकता भासणार आहे. दहा लाख टनापर्यंत निर्यात होईल, असे गृहीत धरले, तरीही काढणीपश्‍चात कांद्याचे नुकसान दहा लाख टनापर्यंत ठरलेले आहे. निर्यात सुरळीत राहिल्यास भावात तेजी-मंदीचे सावट येणार नाही, असे "नाफेड'चे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी म्हटले आहे. मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया व दुबईसह अरब राष्ट्रांत कांद्याची निर्यात होत आहे.

डॉलरच्या घसरणीमुळे डिझेल-पेट्रोलचे दर कमी झाले. पण सरकारला कांद्याच्या निर्यातीसाठी 5 टक्के अनुदानाची मुदत वाढवावी, असे अद्याप वाटलेले नाही. ही मुदत आणखी सहा महिने वाढविल्यास क्विंटलमागे 50 रुपये भाव शेतकऱ्यांना आणखी मिळू शकेल. उन्हाळ कांद्याचे भाव वाढण्यासाठी शेतकऱ्यांना ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष, नाफेड

Web Title: summer oinon rate decrease