काहिली करणाऱ्या उन्हात जिवाची लगीनघाई...

temperature
temperature

वणी (नाशिक)  : आग ओकणाऱ्या तळपत्या सुर्य किरणांचा सामना करीत वऱ्हाडी मंडळी बरोबरच पुढाऱ्यांचा दाट लग्न तिथींमूळे चांगलाच घाम निघत असून आहे. चार दिवस असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चाकरमानेही शहराकडून गावाकडे येवू लागल्याने बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने भरून गेली आहे.

जिल्ह्यातील सर्व भागात तापमान गेल्या आठ दिवसांपासून  ४० अंशांवर पोहोचले आहे. यंदा प्रथमच दिंडोरी, सुरगाणा, पेठ या आदिवासी व डोंगर माथ्यावरील भागातही गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून वैशाख वनवाची अनुभूती अधिकच जाणवत आहे.  अशा तप्त वातावरणातच १९ एप्रिल पासून विवाहांचा धडका सुरु झाला असून एप्रिल एंडला सलग चार दिवस असलेल्या सुट्टयांची संधी साधत व विवाह योग्य मुहूर्तही असल्याने वधु - वराकडील मंडळीनी गेल्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडवले आहे. त्यातच बहुसंख्य विवाह सोहळे हे दुपारचे असल्यानॆ तसेच एकाच दिवशी व वेळेत अनेक लग्न असल्याने तळपत्या उन्हात लग्न सोहळयासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वांचीच तारांबळ उडत आहे. एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने कुटुंबातील सर्वच सदस्य भावकी व मित्र मंडळींच्या लग्नाला हजेरी लाववी लागत आहे. अनेक ठिकाणी फक्त भेट तर काही ठिकाणी आहेर पाठवून लग्न साधल्या जात आहे. कडक उन्हाचा मोठा अडथळा असला तरी जवळच्या लग्नासाठी हजेरी लावणे आवश्यक असते. 

पुढाऱ्यांचीही दमछाक...
त्यातच आगामी लोकसभा, विधानसभा तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत व संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हयास्तरीय नेत्यापासून गावपातळीवरील सर्व पक्षीय पुढारी व इच्छुक उमेदवार भली मोठी यादी करुन आपल्या वातानुकूलित वाहनातून बाहेर येऊन ४० अंशांच्या तापमानात लग्न समारंभाला हजेरी लावत आहे. त्यातच  एकाच दिवशी अनेक लग्न असल्याने भली मोठी यादी सोबत घेऊन  नेते मंडळी गावोगाव फिरताना दिसतात. कुठे लग्न लागून गेलेले असते. कुठे नवरदेवाचे वऱ्हाडच आलेले नसते, अशा परिस्थितीत विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हार-तुरे आणि शाल-श्रीफळ स्वीकारीत पुढारी फिरत अाहे. 

अधिक मासामुळे विवाह तिथी दाट...
मे महिन्यात एक, दोन, चार, सहा, सात, आठ, नऊ, अकरा व बारा या तारखांना विवाहाचे मूहूर्त आहे. यानंतर १६ मे ते १३ जुन या दरम्यान अधिक मास (धोंडा महिना) असल्याने या कालावधीत विवाह मुहूर्त नसल्याने १ मे ते १२ मे दरम्यान मे महिन्यात विवाह सोहळ्यांचा उच्चांक होणार आहे. त्यानंतर १५ जून ते १८ जुलै या कालावधीत फक्त ११ विवाह मुहूर्त असल्याने तसेच पावसाळा, शालेेय प्रवेश, शाळा महाविद्यालय सुरु होत असल्याने या कालावधीत होणारे विवाहांचे प्रमाण कमी असणार आहे. असे असले तरी  उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. 

बाजारपेठ, बसस्थानके गजबजले...
एकाच तिथीला अनेक लग्न असल्यामुळे कापड व्यवसाय, गिफ्ट सेंटर, ज्वेलरी शॉपवर गर्दी दिसून येत आहे. तर उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, थंड शीतपेयाचा आधार नागरिक घेत असल्याने  शितपेये आणि बाटलीबंद पेयांची विक्री वाढली आहे. तसेच बिअरबार व मद्याची दुकानांमध्ये मित्र, नातेवाईक, सहकाऱ्याच्या लग्नात इन्जॉय करण्याच्या नावाखाली गर्दी होत आहे. लग्नतिथी तसेच सुट्टयामुळे बसस्थानकेही प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली असून काही बसस्थानकातून गर्दीनूसार अनेक मार्गांवर अतिरीक्त बसेस सोडण्यात येत आहे.

उन्हापासून बचावाचा डॉक्टरांचा सल्ला...
उष्माघातावर मात करत वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नृत्य करून हाळदी व लग्न समारंभाचा आनंद लुटत आहेत. असे असले तरी अनेक वऱ्हाडी उन्हामुळे भुरळ येऊन पडण्याच्या घटना घडत आहे. यामुळे वऱ्हाडी मंडळीने दुपारी १२ ते ३ यावेळेत जास्त फिरु नये, उन्हाच्या बचावासाठी टोपी, छत्री, रुमालाचा वापर करावा, मद्यसेवन, चहा, कॉफी, कार्बेनेटेड सॉप्ट ड्रिंक्स घेवू नये, जास्तीत जास्त शुध्द पाणी, लिंबू सरबत घेणे व सोबत गुल्कोजचे पाकीट ठेवणे विशेष करून लहान मुलांना या उन्हापासून दूर ठेवावे असा सल्ला डॉक्टरानी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com