ग्रामसेवकाचे निलंबन, तर दोन पर्यवेक्षकांवर कारवाई

geete
geete

नांदगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पाणी टंचाई बाबत हलगर्जीपणा दाखविणाऱ्या तांदुळवाडी येथील ग्रामसेवकावर निलंबनाची तर आहार संहितेनुसार अंगणवाड्यांचे कामकाज होत नसल्याच्या मुद्यावरून अंगणवाडी सेविकेला सेवेतून काढून टाकण्यासोबत दोघा पर्यवेक्षिकावर खातेनिहाय कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर नरेश गीते यांनी काढल्याने तालुका पंचायत स्तरावरील यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वीच तालुका पंचायत समितीला उपसभापती सुभाष कुटे यांनी टाळे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आढावा बैठकीसाठी नाशिकहून आलेल्या जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व गट विकास अधिकाऱ्यांनी उपसभापती कुटे यांची समजूत काढण्यात आल्याने नंतर हे टाळे काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे तालुका पंचायत समिती मध्ये अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने अनेक विकासकामे प्रलंबित राहिल्याचा मुद्दा उपसभापती यांनी उपस्थित केला होता. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गीते बैठकीला येण्यापूर्वीच आंदोलन मागे घतल्याने प्रशासनाला हायसे वाटले होते.

प्रत्यक्षात बैठक सुरु होताच डॉक्टर गीतेंच्या कठोर कारवाईची गाज तांदुळवाडीचे ग्रामसेवक वाघ यांच्यावर पडली टंचाईच्या नुकसानाच्या अनुषंगाने खोटी माहिती सादर केल्याबद्दल कारवाई झाली तर बदली झाल्यावर देखील पाणी पुरवठा योजनांचे दप्तर हस्तांतरित न करणाऱ्या ग्रामसेविका गोसावी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना डॉक्टर गीते यांनी केल्या.

तालुक्यातील नागापूर अंगणवाडी क्रमांक एकच्या सेविका शंकुतला देवरे यांच्या कामात गंभीर चुका आढळल्याने त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देतांना डॉक्टर गीते यांनी पर्यवेक्षिका अलका अढांगळे यांची वेतनवाढ थांबविण्याची सूचना केली तर हिसवळ खुर्दच्या अंगणवाडी क्रमांक दोन बद्दल अनिमियातता आढळून आल्याने पर्यावेक्षिका सुनीता पाचपांडे यांना करणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्यात.  

डॉक्टर गीते यांच्या आढावा बैठकीत कारवाईचा बडगा उगारला गेल्याने सांयकाळी कार्यालयात बैठक संपल्यावर सन्नाटा पसरला होता. कुपोषणाचा आढवा घेताना कर्मचाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचेही बैठकीत आढळून आल्याने तालुकास्तरावर पुन्हा प्रशिक्षण घेण्याचे आदेश त्यांनी बालविकास विभागाच्या उप उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत.

वृक्ष लागवडीचा आढावा घेताना सर्व ग्रामसेवकांनी खड्डे खोदल्याचे सांगितले मात्र तपासणी पथकाला कुठेही खड्डे आढळून न आल्याने डॉ. गिते यांनी याबाबत सत्य परिस्थितीची माहिती देण्याचे आदेश ग्रामसेवकांना दिले. यातून अद्याप तालुक्यात खड्डे खोदण्याचे काम सुरु नसल्याचे ग्रामसेवकांच्या माहितीवरून निदर्शनात आले.

लोकसहभागातून तत्काळ खड्डे खोदण्याचे व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबवून यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेला सहभागी करून घेण्याचे आदेश देण्यात आले.सिंचन विहिर, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश सर्व संबंधिताना देण्यात आले. जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात लेखा शक पूर्ततेबाबत तालुकास्तरावर विशेष शिबीर आयोजित केले असून त्यावेळी अपूर्ण बांधकामाबाबत ज्यांचे काम असमाधानकारक असेल व उद्दिष्ट पूर्ती नसेल त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे.यावेळी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदि विभागांचा आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com