राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी वेळ द्या - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षबांधणी व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात आज दुपारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, समृद्धी महामार्ग करण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेला बळाचा वापर, शेतमालाचे विशेषत: कांद्याचे पडलेले दर या समस्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडून डावलले जात असल्याच्या तक्रारीही केल्याचे समजते.

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षबांधणी व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात आज दुपारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, समृद्धी महामार्ग करण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेला बळाचा वापर, शेतमालाचे विशेषत: कांद्याचे पडलेले दर या समस्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडून डावलले जात असल्याच्या तक्रारीही केल्याचे समजते. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतानाच पक्ष वाढविण्यासाठी वेळ द्या व काम करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारल्याचे चित्र होते. 

महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयदेव गायकवाड, हेमंत टकले, दीपिका चव्हाण, जयवंत जाधव, नरहरी झिरवाळ, सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वास ठाकूर, महिला शहराध्यक्षा सुनीता निमसे, ज्येष्ठ नेते नाना महाले, माजी आमदार दिलीप बनकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, प्रदेश पदाधिकारी डॉ. भारती पवार, अर्जुन टिळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे आदी उपस्थित होते. 

खासदार सुळे यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती. सुरवातीला त्यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महापालिका व पालिका नगरसेवकांशी चर्चा करून पक्षाची स्थिती जाणून घेतली. आपल्या पदाचा उपयोग करून चांगले काम करा व पक्ष वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला. नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. 

विविध सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी नाशिक भागातील विविध प्रश्‍न व संघटनेच्या यश-अपयशावर चर्चा केली. संघटना बांधणीसाठी काम करण्याबाबत चर्चा झाली. 

Web Title: Take the time to increase the NCP party